नाशिकमध्ये लष्कराचं सुखोई विमान कोसळलं

नाशिकमध्ये लष्कराचं सुखोई विमान कोसळलं

सुखोई विमान अपघात

पुन्हा एकदा लष्कराचे लढाऊ विमान कोसळल्याची घटना समोर आली आहे. नाशिकच्या पिंपळगावाजवळील वावी ठुशी येथे ही घटना घडली. या गावातील एका द्राक्ष बागेत लष्कराचं सुखोईचं विमान कोसळून अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. तांत्रिक बिघाडामुळे लढाऊ विमान कोसळल्याचे समजते. मोकळ्या जागेवर विमान कोसळल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र विमान जळून खाक झालं आहे. विमानात दोन पायलट होते. तांत्रिक बिघाडाचे समजताच दोघांनीही पॅरेशूटच्या मदतीने विमानाबाहेर झेप घेतली. अपघाताची बातमी समजताच स्थानिक पोलीस आणि वायू सेनेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

सुखोई विमान अपघात (सौजन्य-झी मीडिया)

वारंवार कोसळतं विमान 

यापूर्वीही ४ जून रोजी भारतीय हवाई दलाचं जॅग्वार हे लढाऊ विमान कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा परिसरात कोसळलं होतं. या दुर्घटनेत वैमानिकाचा मृत्यू झाला होता. तर जानेवारी महिन्यात ओएनजीसीचं ५ कर्मचारी आणि पायलटसह ७ जणांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर डहाणूजवळ कोसळलं होतं. यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला होता. डहाणू जवळ २० नॉटिकल्स माईल्सदरम्यान हे हेलिकॉप्टर कोसळलं होतं. तर समुद्रात काही ठिकाणी या हेलिकॉप्टरचे अवशेष आढळले होते. वारंवार लष्कराच्या विमानांचे अपघात होण्याच्या घटना घडत असून यामध्ये वायूसेनेतील जवानांसोबत ज्या परिसरात विमान कोसळतं, तेथील स्थानिकांचाही जीव धोक्यात येत आहे. या प्रकारांकडे सरकारने गांभिऱ्याने लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी स्थानिक करत आहेत.

First Published on: June 27, 2018 12:16 PM
Exit mobile version