कोण कसा विचार करतो माहीत नाही, फडणवीस-राज भेटीवरून सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

कोण कसा विचार करतो माहीत नाही, फडणवीस-राज भेटीवरून सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

MP Supriya Sule

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. ही भेट राज ठाकरे यांच्या निवासस्थान शिवतीर्थवर झाली. राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारफूस करण्यासाठी भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भेटीत राजकीय चर्चा झाल्याची शक्यता असून या भेटीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सगळे काही स्वार्थासाठी सुरु असल्याची टीका केली आहे.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या – 

दरारा, प्रतिष्ठा या गोष्टी कर्तृत्व आणि कामातून होतात. कोणी कोणाच्या घरी गेले याच्यातून होत नाहीत. ज्यांच्याकडे एक आमदार आहे त्यांच्या घरी १०५ आमदार असणारा नेता जातो. याचे काय करणार तुम्ही? कोण कसा विचार करते हे मला माहिती नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात जे काही सुरु आहे ते सर्वसामान्यांच्या हितासाठी नाही, फक्त स्वत:च्या स्वार्थासाठी सुरु आहे, अशी टीका केली.

राज ठाकरेंवर झाली होती शस्त्रक्रिया –

गेल्या महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर हिपबोन शस्त्रक्रिया झाली होती. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही सदिच्छा भेट असल्याचे भाजपाच्या गोटातून सांगितले जात आहे. मात्र, सध्या राज्यात निर्माण झालेल्या राजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर व मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांमुळे या भेटीमध्ये बदलत्या राजकीय समीकरणांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

राज ठाकरेंनी फडणवीसांना पाठवले होते पत्र –

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर राज ठाकरेंनी फडणवीसांचे कौतुक करणारे पत्र त्यांना पाठवले होते. या पत्रामध्ये पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिले. पक्षाशी बांधीलकी म्हणजे काय असते त्याचा हा वस्तुपाठच आहे. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरुपी लक्षात ठेवण्यासाठी आहे. खरोखरच अभिनंदन, अशा शब्दांत फडणवीसांचे राज ठाकरे यांनी अभिनंदन केले होते.

First Published on: July 15, 2022 3:37 PM
Exit mobile version