सुरेश जैन ब्रीच कॅंडी रुग्णालयात; प्रकृती अचानक बिघडली

सुरेश जैन ब्रीच कॅंडी रुग्णालयात; प्रकृती अचानक बिघडली

सुरेश जैन

जळगावः घरकुल घोटाळ्यातील आरोपी सुरेश जैन यांना शुक्रवारी तातडीने जळगावहून मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

जैन यांना न्यूमोनियाची लागण झाली आहे. त्यांना अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यांना जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना मुंबईत हलवण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला. त्यानुसार एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईत आणून जैन यांना ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे नातलगांनी सांगितले.

जळगाव येथील घरकुल घोटाळा मध्यंतरीच्या काळात खूप चर्चेत राहिला. या घोटाळ्याचा जैन यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. त्यांच्याविरोधात याचा खटलाही चालला. न्यायालयाने याप्रकरणी जैन यांना दोषी धरत शिक्षा ठोठावली. नुकताच त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी खास कारपेट टाकण्यात आले होते.

न्यायालयातून बाहेर आल्यानंतर जैन हे राजकारणातून सन्यास घेणार की पुन्हा सक्रिय होणार, अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र आपण आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत असणार असे जैन यांनी जाहीर केले. पुढे ते म्हणाले, चाळीस वर्षांत जे चांगले करता आले, ते करण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला. सर्वांशी चर्चा करूनच पुढचे सर्वकाही ठरविले जाईल, असे जैन यांना सांगितले.

जळगाव घरकुल योजना ही जळगाव नगरपालिकेची होती. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना स्वस्त दरात चांगली घरे देण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने झोपडपट्टी निर्मूलनाच्या उद्देशाने ही योजना राबवण्याचे ठरवले. त्यासाठी हरी विठ्ठलनगर, खंडेरावनगर, समतानगर आणि तांबापुरा या ठिकाणी सुमारे ११० कोटींचे कर्ज काढून ११ हजार घरकुले बांधण्याच्या कामास १९९९ मध्ये सुरुवात झाली.

या योजनेतील सावळागोंधळ सन २००१ मध्ये समोर आला. या ठेकेदाराला नियमबाह्य पद्धतीने सुमारे २९ कोटी रुपये बिनव्याजी आणि आगाऊ देण्यात आले. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या ही बाब लक्षात आल्यावर ३ फेब्रुवारी २००६ रोजी शहर पोलीस ठाण्यात घरकुल योजनेत २९ कोटी ५९ लाख नऊ हजार रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार देण्यात आली. शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री सुरेश जैन, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह सर्व ४८ संशयित आरोपींना धुळे जिल्हा कोर्टाने दोषी ठरवले.

First Published on: December 24, 2022 12:35 PM
Exit mobile version