गटविकास अधिकाऱ्यांची सरप्राईज व्हिजिट; ‘झेडपी’च्या शाळेत १४ पैकी तब्बल १२ शिक्षिका गैरहजर

गटविकास अधिकाऱ्यांची सरप्राईज व्हिजिट; ‘झेडपी’च्या शाळेत १४ पैकी तब्बल १२ शिक्षिका गैरहजर

नाशिक : पिंपरी सय्यद ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांच्या केलेल्या तक्रारी नंतर गटविकास अधिकारी व गट शिक्षण अधिका-यांनी अचानक दिलेल्या भेटीत 14 पैकी 12 शिक्षिका परिपाठ सुरु होण्याच्या वेळेत हजर नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील पिंपरी सय्यद गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या अनियमितपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार पिंपरी सय्यद ग्रामपंचायतीने केल्यावर शुक्रवारी (दि.18) सकाळी सव्वा दहा वाजता गट विकास अधिकारी डॉ. सोनिया नाकाडे व गट शिक्षण अधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी जिल्हा परिषद शाळेत अचानक भेट देऊन शहानिशा केली, यावेळी शाळेत परिपाठ सुरु होतांना केवळ दोनच शिक्षिका आढळून आल्या, चौदा पैकी बारा शिक्षिका उशिराने हजर झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर अधिका-यांनी या शिक्षकांना चांगलेच धारेवर धरले होते, प्रत्येक वर्गात जाऊन डॉ. नाकाडे व डॉ. चौधरी यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासणी केली.

ग्रामपंचायतीच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्यानंतर गटविकास अधिकारी डॉ. नाका़डे यांनी ग्रामपंचायतीला सदर विषयावर पंचायत समितीकडे लेखी तक्रार देण्यास सांगितले. त्यामुळे पिंपरी सैय्यद गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांच्या हलगर्जीपणावर प्रशासन नेमकी काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे. यावेळी सरपंच भाऊसाहेब ढिकले, सदस्य सुकदेव पवार, कैलास पोटींदे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सोमनाथ ढिकले, आदी उपस्थित होते. दरम्यान, गावातील जिल्हा परिषदेची वाल्मिक नगर भागातील शाळेला भेट दिली यावेळी येथील सर्व शिक्षक हजर होते, व विद्यार्थी गुणवत्ता उत्तम असल्याचे गटविकास अधिकारी डॉ. नाकाडे यांनी सांगितले.

पिंपरी गाव शहराच्या जवळ असल्याने सोयीने नोकरी करणा-या अनेक शिक्षिकांच्या बदल्या होत नाहीत, विद्यार्थ्यांची गुणवत्ता खालावल्याने पालकांनी केलेल्या तक्रारी नंतर ग्रामपंचायतीने शिक्षकांच्या विरोधात केलेल्या तक्रारी वर प्रशासनाने गंभीर दखल घेतली, वर्षानुवर्षे या शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिकांची बदली करणे, चौदा पैकी 7 महिला व 7 पुरुष शिक्षक नेमण्याची मागणी आहे. : भाऊसाहेब ढिकले, सरपंच, पिंपरी सय्यद

First Published on: August 19, 2023 5:40 PM
Exit mobile version