“छे! आमच्यात साम्य नाहीच..” सुषमा अंधारेंची अमृता फडणवीसांवर टीका

“छे! आमच्यात साम्य नाहीच..” सुषमा अंधारेंची अमृता फडणवीसांवर टीका

बुधवारी लोकमत वृत्त समुहाच्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amurta Fadnavis) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. पण सर्वाधिक चर्चा होत आहे ती अमृता फडणवीस यांच्या मराठीची. पण याबाबत आता ठाकरे गटाच्या महिला उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी एक फेसबूक पोस्ट केली आहे. या फेसबूक पोस्टच्या माध्यमातून सुषमा अंधारे यांनी मिसेस उपमु्ख्यमंत्र्यांवर टीका देखील केली आहे. अंधारे यांनी अमृता फडणवीस यांच्या एका जुन्या मुलाखतीचा संदर्भ देत टीकास्त्र डागले आहे. तर राज ठाकरे यांना अमृता फडणवीस यांच्या मराठी भाषेबाबत नेमके काय वाटले असेल, हे देखील अंधारे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

सुषमा अंधारे यांची फेसबूक पोस्ट…
“अमृता वहिनींना मी त्यांच्यासारखे वाटते असं त्या जाहीरपणे एका मुलाखती दरम्यान म्हणाल्या. मी सतत विचार करत होते की मी त्यांना कोणत्या अँगलने त्यांच्यासारखी वाटत असेल बरं ?
… कारण दिसायला तर त्या निश्चितपणे माझ्यापेक्षा अधिक सुंदर आहेत. श्रीमंत ही आहेत. बाकी मला नरडं आहे त्यांना गळा आहे. मग काय साधर्म्य असेल आमच्या मध्ये ? मग मला कधीतरी वाटलं की कदाचित भाषा प्रभुत्व हे दोघीतलं साम्य असेल का?.
पण छे ! कालची मुलाखत आणि त्यातलं त्यांचं कॉन्टिनेन्टल उच्चारात मराठी ऐकलं अन् खात्री पटली की आमच्यात साम्य असे काहीच असु शकत नाही.
पण त्या ही पेक्षा मराठी मनाचे मानबिंदू असणारे , मराठी भाषेचे पाईक, मराठी वाचवा चा ध्यास घेणारे, वेळप्रसंगी मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉ ची पुस्तके सुध्धा मराठीत व्हावीत यासाठी कृष्णकुंज चे रान हादरवणारे राजदादा यांना, मी बोल्ली, मला चान्स मिळाली, या टाईपच मराठी ऐकुन कानात शिसं ओतल्यासाखं झालं असेल..”

हेही वाचा – मनसेचे हम साथ साथ है कोणाबरोबर? अमृता फडणवीसांच्या प्रश्नाला राज ठाकरेंचे सडेतोड उत्तर

सुषमा अंधारे आणि अमृता फडणवीस यांच्यामध्ये कायमच शीतयुद्ध सुरू असल्याचे पाहायला मिळते. एका कार्यक्रमामध्ये अमृता फडणवीस यांनी “सुषमा अंधारे या आधी मला माझ्यासारख्या वाटत होत्या. आता त्यांचं बोलणं स्क्रिप्टेड असतं.” असे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याची आठवण करून देत सुषमा अंधारे यांनी अमृता फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली आहे. लोकमत समुहाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली होती. यावेळी अमृता फडणवीस यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे देखील व्यासपीठावर मुलाखत घेण्यासाठी उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी देखील सडेतोड उत्तरे दिली. तर त्यांच्या काही उत्तरांमुळे तर कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लोकांमध्ये एकच हशा पिकला.

First Published on: April 27, 2023 5:19 PM
Exit mobile version