काँग्रेसने अखेर कारवाईचा ‘हात’ उगारला

काँग्रेसने अखेर कारवाईचा ‘हात’ उगारला

मुंबई – विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून मिळालेली अधिकृत उमेदवारी नाकारून आपल्या मुलाला अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरविणारे काँग्रेसचे मावळते आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यावर काँग्रेसने रविवारी निलंबनाची कारवाई केली. शेवटच्या क्षणापर्यंत पक्षाला अंधारात ठेवून मुलगा सत्यजितला अपक्ष म्हणून अर्ज भरायला लावण्याच्या प्रकाराची पक्षाकडून चौकशी करण्यात येणार आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत काँग्रेसकडून सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र ऐनवेळी सुधीर तांबे यांनी सत्यजितसाठी माघार घेतली. या प्रकाराने काँग्रेसची मोठी नाचक्की झाली. या निवडणुकीत सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीला भाजपची फूस असल्याचे भाजप नेत्यांच्या प्रतिक्रियांवरून दिसून येते.

सत्यजित तांबे यांनी पाठिंबा मागितल्यास त्यांच्या मागणीचा आपण विचार करू, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेसने याप्रकरणी पक्षश्रेष्ठींनी माहिती देऊन कारवाईची मागणी केली. त्यानंतर काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने डॉ. सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. चौकशी होईपर्यंत हे निलंबन राहणार आहे.

दरम्यान, सत्यजित तांबे हे भाजपचा पाठिंबा घेणार असल्याची चर्चा आहे. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्यजित तांबे यांनी अजून भाजपकडे पाठिंबा मागितलेला नाही. पाठिंब्याचा प्रस्ताव आल्यास भाजपचे संसदीय मंडळ त्यावर निर्णय घेईल, असे स्पष्ट केले. कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना संधी देण्याची भाजपची कायमच भूमिका राहिल्याचेही ते म्हणाले.

नागपुरातून नागो गाणार यांना पाठिंबा-फडणवीस

शिक्षक परिषदेने नागो गाणार यांना उमेदवारी दिली आहे. वर्षानुवर्षे ही जागा शिक्षक परिषद लढत आहे. भाजप आणि मित्रपक्ष त्यांना समर्थन देत असतात. यावेळीदेखील आम्ही पूर्ण समर्थन नागो गाणार यांना दिले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितली.

First Published on: January 16, 2023 4:40 AM
Exit mobile version