बलात्कारी आरोपीसह पार्टी भोवली, दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन

बलात्कारी आरोपीसह पार्टी भोवली, दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन

बलात्कारी आरोपीच्या पार्टीमुळे दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन

बीडमधील एका मतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला न्यायालायने वीस वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. मात्र शिक्षेचा निर्णय झाला त्याचदिवशी आरोपी एका हॉटेलमध्ये दोन पोलिस अधिकाऱ्यांसोबत दारुची पार्टी करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली. त्यामुळे हे प्रकरण दोन पोलीस अधिकाऱ्यांना चांगलेच भोवले आहे.  याप्रकरणात आता दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सहाय्यक फौजदार नामदेव धनवडे व हवालदार सत्यवान गर्जे असे या पोलीस अधिकाऱ्यांचे नाव आहे. एका वृत्तपत्राने आरोपीसह पोलीस अधिकाऱ्यांच्या पार्टीचे लाईव्ह स्टिंग ऑपरेशन केले होते. त्यानंतर या दोन्ही पोलीसांवर कारवाई करण्यात आली.

बीडमधील मुकबधिर मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी तुकाराम कूडुकला बीड जिल्हा व सत्र न्यायालयाने वीस वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. मात्र न्यायालयात हजर करणारे दोन पोलीसच आरोपी तुकाराम कूडुकसह एसपी ऑफिसजवळीव हॉटेलमध्ये चक्क दारू पित असल्याची धक्कादायक प्रकार समोर आले. या प्रकरणाची बीडचे पोलीस अधीक्षक आर. राजा व अप्पर अधीक्षक सुनील लांजेवार यांनी गांभीर्याने दखल घेत चौकशीचे आदेश दिले. यानंतर गृह विभागाचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक उमेश कस्तुरे यांनी चौकशी करत तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

या आदेशानंतर अहवाल मिळताच गुरुवारी पोलीस अधीक्षकांनी दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले. हे दोन्ही अधिकारी पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. त्यांच्यावर आरोपी बंदोबस्त आणि पैरवी अधिकारी म्हणून जबाबदारी होती. मात्र बलात्कारासारख्या गंभीर गुन्हातील दोषी आरोपीसह पोलीसांनी अशाप्रकारे मद्य पार्टी करणे कुठे तर वर्दीला डाग लावणारे होते. त्यामुळे या प्रकरणाने बीड जिल्ह्यात पोलीसांच्या कार्यप्रणालीवर शंका उपस्थित केली जात आहे.


 

First Published on: March 13, 2021 2:41 PM
Exit mobile version