आता बाप्पाचा प्रसादही ऑनलाइन… तोही फ्री-होम डिलीव्हरी

आता बाप्पाचा प्रसादही ऑनलाइन… तोही फ्री-होम डिलीव्हरी

ऑनलाइन प्रसाद देणारी वेबसाइट

सध्या ऑनलाइनचा जमाना आहे. अनेक गोष्टी या ऑनलाइनच बुक करुन त्या घरपोच किंवा कार्यालयात मागवल्या जातात. पण तुम्ही कधी बांप्पाचा प्रसाद ऑनलाइन मागवलाय का? आणि तोही घरपोच, फुकट… कदाचित तुमचे उत्तर नाहीच असेल. पण मुंबईत एका सार्वजनिक मंडळाने ही सोय उपलब्ध करून दिली आहे. सायन प्रतीक्षा नगर मधील ‘लंबोदर मंडळा’ने बाप्पाचा प्रसाद ऑनलाइन पद्धतीने घरपोच पोहोचवण्याची संकल्पना मागील वर्षापासून सुरू केली आहे.

अशी सुचली संकल्पना

सायन प्रतीक्षा नगर येथे गेल्या १० वर्षांपासून ‘मुंबईचा लंबोदर’ मंडळ गणरायाची प्रतिष्ठापना करत आहे. गेल्यावर्षीपासून मंडळातील तरुणांनी एक वेगळी शक्कल लढवली. अनेकदा आपण मोठमोठ्या बाप्पाच्या दर्शनाला जातो. पण साधा बाप्पाचा प्रसाद देखील भक्तांना या गर्दीत मिळत नाही. त्यामुळे गेल्यावर्षी पासून या मंडळातील तरुणांनी जे बाहेर पडू शकत नाही तसेच ग्रामीण भागातील लोक मुंबईत येऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी आपल्या वेबसाईटवर ऑनलाइन प्रसादाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कुरिअरने घरपोच आणि फुकट प्रसाद दिला जाणार आहे. त्यासाठी त्यांनी www.mumbaichalambodar.com ही वेबसाईट सुरू केली. ज्याच्यावर जाऊन तुम्ही बाप्पाचा प्रसाद ऑनलाइन मागवू शकता.

गेल्यावर्षी दिला ३०० जणांना घरपोच प्रसाद

मागच्यावर्षी मंडळाने ज्यांना शक्य असेल त्यांच्या घरी जाऊन तसेच लांब राहणाऱ्यांच्या घरी कुरियरने प्रसाद पोहोचवला. तब्बल ३०० लोकांना प्रसाद देण्यात आला होता. यंदाही आतापर्यत १०० जणांना प्रसाद पोहोचवला आहे. ‘एका बॉक्समध्ये प्रसाद पॅक करून आम्ही कुरिअरने हा प्रसाद पोहोचवतो’, अशी प्रतिक्रिया या मंडळाच्या तरुणांनी दिली.

प्रत्येक ठिकाणी आपण बाप्पाच्या दर्शनाला जातो. गर्दी असते त्यामुळे कुणालाच प्रसाद मिळत नाही. त्यामुळे आम्ही ठरवले की बाप्पाचा प्रसाद घरपोच लोकांना द्यायचा. म्हणून आम्ही हा उपक्रम सुरू केला. – अनिवृद्ध पडवळ, मंडळाचा कार्यकर्ता

First Published on: September 16, 2018 5:22 PM
Exit mobile version