खाजगी रूग्णालयातील प्रसुती सेवा सुधारण्यासाठी ‘लक्ष्य मान्यता उपक्रम’

खाजगी रूग्णालयातील प्रसुती सेवा सुधारण्यासाठी ‘लक्ष्य मान्यता उपक्रम’

माता आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी खाजगी रुग्णालयातील प्रसुती सेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी ‘लक्ष्य मान्यता’ उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. या उपक्रमातून प्रसूती सेवेचा दर्जा अधिक उंचावण्यास मदत होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात दिली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग आणि फेडरेशन ऑफ ऑबस्टेट्रिक अँड गायनोकॉलोजीकल सोसायटी ऑफ इंडिया (फॉग्सी) यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष मान्यता उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याचा शुभारंभ नुकताच पुण्यातील औंध जिल्हा सामान्य रुग्णालयात आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला असून आरोग्यमंत्र्याच्या हस्ते या उपक्रमाच्या बोध चिन्हाचे आणि संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

प्रसुतीदरम्यान आणि प्रसुती पश्चात गुणात्मक सेवा

राज्यातील महिलांच्या सुरक्षित प्रसुतीसाठी तसेच खाजगी संस्थांमध्ये सेवांचा दर्जा सुधारून प्रसूती दरम्यान होणाऱ्या माता मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी लक्ष्य मान्यता उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रसुती दरम्यान आणि प्रसुती पश्चात गुणात्मक सेवा उपलब्ध करून माता आणि नवजात बालकांचे होणारे मृत्यू कमी करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

‘लक्ष्य मान्यता’ दर्जात्मक सेवा

‘लक्ष्य मान्यता’ दर्जात्मक सेवा मानांकनाचा अवलंब करण्यासाठी नोंदणीकृत रूग्णालयांना दर्जात्मक सेवेच्या २६ मानाकांवर आधारीत रूग्ण काळजी, सुरक्षितता, गुणवत्ता आणि सुविधा सुधारणे याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. खाजगी प्रसूती रुग्णालयांमध्ये गुणवत्ता मानकांना चालना देण्यासाठी आणि शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक असून या उपक्रमामुळे माता आणि बालकांना गुणात्मक सेवा उपलब्ध होण्यास मदत होईल, असेही आरोग्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले आहे.


हेही वाचा – रुग्णवाहिका ठरतेय चाकावरचे ‘प्रसुतीगृह’


 

First Published on: September 11, 2019 8:10 PM
Exit mobile version