खुशखबर…शिक्षकांचा जागांची मेगाभरती

खुशखबर…शिक्षकांचा जागांची मेगाभरती

शिक्षक भरती

शालेय शिक्षण विभागातील बहुप्रतिक्षीत प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक भरतीची जाहीरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पवित्र वेब पोर्टलवर प्रदर्शित करण्यात आली. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार संपूर्ण महाराष्ट्रात १०,००१ इतक्या शिक्षकांच्या जागा भरल्या जातील. यापैकी अनुसूचित जाती- १७०४, अनुसूचित जमाती- २१४७, अनुसूचित जमाती (पेसा)- ५२५, व्हि.जे.ए.- ४०७, एन.टि.बी.- २४०, एन.टी.सी- २४०, एन.टी.डी.- १९९, इमाव- १७१२, इ.डब्ल्यू.एस- ५४०, एस.बी.सी.- २०९, एस.ई.बी.सी.- ११५४, सर्व साधारण- ९२४ या संवर्गातील जागांचा समावेश आहे.

पवित्र पोर्टलद्वारे भरती

पवित्र पेार्टलच्या माध्यमातून भ्रष्टाचार विरहीत ही पहिलीच शिक्षक भरती होणार आहे आणि यातून शिक्षकांच्या भरतीच्या वेळी होणारे शिक्षकांचे शोषण थांबविण्यात शासनाला यश आले आहे. विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलमध्ये अर्ज करताना पोर्टलवरील माहिती शांतपणे वाचावी, कोणीही गोंधळून जाऊ नये, जेणेकरुन कमीत कमी त्रुटी राहतील. अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती आता सुरु होत आहे. यासाठी शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, उपसचिव चारुशिला चौधरी यांच्या कार्यगटाने परीश्रम करुन काम पूर्ण केले आहे.

शिक्षक भरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवर सध्या संस्थाचालक आणि शिक्षणाधिकारी यांना उपलब्ध होईल. २ मार्च २०१९ रोजी शिक्षक भरतीची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिध्द होणार आहे, आणि त्याच वेळी पवित्र पोर्टलवर सदर जाहिरात उमेदवारांना पहावयास मिळणार आहे.

काय म्हणाले तावडे

सुमारे ५००० च्या वर शिक्षक अतिरिक्त झाल्यामुळे समायोजनात रिक्त जागा कमी झाल्या. ६ जिल्ह्यातील बिंदू नामावलीनंतर शून्य जागा खुल्या, एसईबीसी आणि ईबीसी वर्गासाठी दिसल्यामुळे त्या सहा जिल्ह्यांच्या बिंदूनामावलीची फेरतपासणी केल्यानंतर या जागा त्वरीत भरल्या जातील, तोपर्यंत ५० टक्के तिथल्या जागा भरल्या जातील. दरम्यान सर्व संबंधित गटाशी विचारविनिमय केला, त्यांच्या सूचना विचारात घेतल्या. या सर्व प्रवासात सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तींचे शिक्षक भरती प्रक्रिया यशस्वीपणे सुरु करण्यामध्ये योगदान आहे. यापुढे देखील अशाच प्रकारे सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे असेही विनोद तावडे यांनी सांगितले.

First Published on: February 28, 2019 2:21 PM
Exit mobile version