TET Exam Scam : टीईटी घोटाळ्यात IAS अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक, पुणे सायबर क्राईम पोलिसांची कारवाई

TET Exam Scam : टीईटी घोटाळ्यात IAS अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक, पुणे सायबर क्राईम पोलिसांची कारवाई

शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणात (TET Exam Scam) पुणे सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत एका सनदी अधिकाऱ्याला बेड्या घातल्या आहेत. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक केली आहे. प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याचा या घोटाळ्यातील सहभाग हा पहिल्यांदाच समोर आला आहे. सुशील खोडवेकर यांना अटक केल्याच्या माहितीवर पुणे सायबर पोलिसांनीही शिक्कामोर्तब केले आहे. आज ठाण्यातून त्यांना अटक केले असून शिवाजी नगर न्यायालयात त्यांना हजर केले जाणार आहे.

कोण आहेत सुशील खोडवेकर ?

पुणे सायबर पोलिसांनी अटक केलेले आयएसएस अधिकारी सुशील खोडवेकर हे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे उपसचिव आहेत. मुंबई येथे ते उपसचिव पदावर कार्यरत आहेत. टीईटी घोटाळ्यामध्ये याआधी तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली होती. तसेच अभिषेक सावरीकर, प्रितीश देशमुख यांना याआधीच अटक करण्यात आली आहे.

याआधीच पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी टीईटी घोटाळ्यात ७ हजार ८०० विद्यार्थ्यांचे गुण वाढवून दिल्याचे शिक्षक पात्रता परीक्षेतील निकालाच्या चौकशीत सिद्ध झाल्याचे सांगितले होते. २०१९-२० च्या घोटाळ्यात अपात्र परीक्षा परीक्षार्थींचे गुण वाढवून दिल्याची माहिती उघड झाली होती. मूळ निकाल आणि राज्य परीक्षा परिषदेकडूनचा प्रत्यक्ष जाहीर केलेला निकाल सायबर पोलिसांनी पडताळूनच ही माहिती निष्पन्न झाली आहे. याआधी २०१९-२० च्या परीक्षेत एकुण १६ हजार ७०५ परीक्षार्थींना पात्र ठरवण्यात आले. निकाल पडताळणी केल्यानंतर जवळपास ७ हजार ८८० परीक्षार्थी हे अपात्र ठरल्याचे निष्पन्न झाले.

 


 

First Published on: January 29, 2022 3:24 PM
Exit mobile version