कलावंतांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत

कलावंतांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत

कोरोनामुळे आर्थिक कुचंबना सहन कराव्या लागणार्‍या सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील कलाकारांना आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. प्रयोगात्मक कलांवर उदरनिर्वाह असलेल्या ५६ हजार एकल कलावंतांना ५ हजार रुपये प्रती कलाकार याप्रमाणे २८ कोटी तर प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील ८४७ संस्थांना सहा कोटी असे एकूण रुपये ३४ कोटी आर्थिक सहाय्य देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

मदतीसाठी पात्र कलावंतांची निवड वृत्तपत्र आणि इतर माध्यमातून जाहिरातीव्दारे अर्ज मागवून करण्यात येईल. एकल कलावंत निवडीसाठी जिल्हाधिकारी स्तरावरील समिती कलावंतांची निवड करेल. संस्थांची निवड सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या स्तरावरील समितीव्दारे करण्यात येईल. पात्र कलावंताच्या बँक खात्यात सदर रक्कम जमा करण्यात येणार आहे.

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने राज्यासह संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू होता. तसेच लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतरही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, नाट्यगृहे, चित्रपटगृहे यांच्यावर बंदी असल्याने प्रयोगात्मक कला क्षेत्रातील संघटित आणि असंघटित विविध कला प्रकारातील कलाकार यांची आर्थिक कुचंबना झाल्याची बाब लक्षात घेता त्यांना आर्थिक सहाय्य देण्याची मागणी सरकारच्या विचाराधीन होती. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

First Published on: October 14, 2021 6:35 AM
Exit mobile version