राज्य सरकारची मोठी घोषणा, वारकऱ्यांना दर महिना पाच हजार मानधन

राज्य सरकारची मोठी घोषणा, वारकऱ्यांना दर महिना पाच हजार मानधन

सांस्कृतिक कार्य आणि वारकरी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या बैठकीत महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना काळामध्ये अडचणीत सापडलेल्या प्रत्येक वारकऱ्याला महिन्याला पाच हजार रुपये मानधन देण्याची घोषणा सरकारने केली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी वारकऱ्यांच्या इतर मागण्यांबाबतही सकारात्मक निर्णय घेऊ, असं आश्वासन देखील दिलं.

सांस्कृतिक कार्य आणि वारकरी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने संतपीठ संदर्भात बैठक विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात बुधवारी सकाळी आयोजित करण्यात आली होती. वारकरी साहित्य परिषदेने काही मागण्या केल्या होत्या. त्यामध्ये वारकऱ्यांना पाच हजार रुपये मानधन मिळावं, ज्येष्ठ कलावंतांच्या मानधनात वाढ व्हावी आणि राज्यात भव्य असं संतपीठ उभं रहावं या प्रमुख मागण्यांचा समावेश होता. वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी या मागण्या बैठकीत मांडल्या होत्या.

संतपीठ बैठकीच्या अनुषंगाने वारकरी सपंद्रायाचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचले आहेत. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यातील लोककलावंतांना कोविड काळात 5 हजार रुपयांची मदत करण्यात येत आहे. जिल्ह्यातील कलाकारांची नोंदणी करण्याचे काम जिल्हाधिकाऱ्यांमार्फत होत असून राज्यातील कलाकार आणि वारकरी संप्रदाय वर्गाची नोंद घेण्यात येईल. राज्यातील वृद्ध कलावंतांना देण्यात येणाऱ्या मानधनातही वाढ करण्यात येईल, असं अमित देशमुख यांनी सांगितलं.

वारकरी संप्रदायाने शासनाकडे केलेल्या मागण्या मान्य असून या संप्रदायाकडे लक्ष देणे, त्यांची काळजी घेणे ही शासनाची जबाबदारी आहे.आजच्या या बैठकीच्या अनुषंगाने वारकरी संप्रदायाने केलेल्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.

First Published on: September 9, 2021 10:50 AM
Exit mobile version