कथित १९ बंगल्यांप्रकरणी ठाकरे गटाचे प्रशांत मिसाळ यांना अटक

कथित १९ बंगल्यांप्रकरणी ठाकरे गटाचे प्रशांत मिसाळ यांना अटक

संग्रहित छायाचित्र

अलिबाग : मुरुड तालुक्यातील कोर्लई कथित १९ बंगल्यांप्रकरणी रेवदंडा पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार तत्कालीन सरपंच प्रशांत मिसाळ यांना रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आज, सोमवारी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास अटक केली. मिसाळ यांना अटक करून रेवदंडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मिसाळ यांना झालेली अटक म्हणजे ठाकरे गटाला फार मोठा धक्का असल्याचे बोलले जाते

मुरुड तालुक्यातील कोर्लई येथील नऊ एकर जागा ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार रवींद्र वायकर याच्या पत्नी मनीषा वायकर यांच्या नावे आहे, असे सांगितले जाते. या जागेवर कथित १९ बंगले असल्याची बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लपवून ठेवली असल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या सातत्याने करीत आहेत. या प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी सोमय्या प्रयत्न करीत होते. अखेर गुरुवारी २३ फेब्रुवारी २०२३ रोजी रेवदंडा पोलीस ठाण्यात संगीता लक्ष्मण भांगरे, (ग्रामविकास अधिकारी मुरुड) यांच्या तक्रारीनुसार फसवणूक, संगनमत, १९ बंगल्यांच्या रेकॉर्डमध्ये खाडाखोड करणे यानुसार तत्कालीन ग्रामसेवक देवंगणा वेटकोळी, विनोद मिंडे, वेदिका म्हात्रे, तत्कालीन सरपंच प्रशांत मिसाळ, गोविंद वाघमारे, रेश्मा मिसाळ, रीमा पिटकर आणि तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्किटेक्ट दिवंगत अन्वय नाईक यांच्याकडून २०१४ साली मुरुड तालुक्यातील कोर्लई येथे ९ एकर जागा रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्या नावे खरेदी करण्यात आली. आहे. या जागेत १९ बंगले असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या वारंवार करीत होते. याबाबत कोर्लई ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सोमय्या पाठपुरावा करीत होते. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी दबाव आणून अधिकाऱ्यांमार्फत कागदपत्रात छेडछाड केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

किरीट सोमय्यांच्या आरोपांनुसार, २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी अलिबाग येथील कोर्लई ग्रामपंचायतीतील १९ बंगले स्वतःच्या नावावर करण्यासाठी पत्र लिहिले होते. हे पत्रदेखील किरीट सोमय्या यांनी माध्यमांमध्ये शेअर केले होते. त्यानंतर हे बंगले रश्मी ठाकरे यांच्या नावावर झाले. २०२०मध्ये त्यांनी १९ बंगल्यांचा मालमत्ता करही भरल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी हा कर भरला आहे. एवढेच नाही तर त्यापूर्वीची दोन वर्षे रश्मी ठाकरे यांनी आणि त्याआधी सहा वर्षांचा मालमत्ता कर अन्वय नाईक यांनी भरल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

First Published on: April 11, 2023 12:14 AM
Exit mobile version