जिवंत शिक्षकाला पालिकेने मृत्यूचा दाखला नेण्यासाठी केला फोन

जिवंत शिक्षकाला पालिकेने मृत्यूचा दाखला नेण्यासाठी केला फोन

महापालिकेच्या कारभाराबाबत ऐकावे तेवढे थोडेच आहे. त्यातच बेकायदेशीर अभिनेत्रीला लस दिल्याचा प्रकार असो.. किंवा एकाच महिलेला १५ मिनिटांत कोरोना लस देताना तीन वेळा सुई टोचल्याचा प्रकार असो.. त्या पाठोपाठ आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाणेकर असलेले चंद्रशेखर देसाई नामक शिक्षकाला चक्क त्यांच्याच मृत्यूचा दाखला तयार असल्याचा एक फोन ठाणे महापालिकेतून आला आहे. या फोनमुळे देसाई कुटुंबाला नाहक मन:स्तापाला तोंड द्यावे लागत आहे. याचदरम्यान महापालिकेने मात्र सोयीस्करपणे हात झटकण्याचे काम केले आहे.

घोडबंदर रोडवरील मानपाडा येथे राहणारे चंद्रशेखर देसाई (५५) हे गेल्या २० वर्षांपासून ठाण्यात वास्तव्यास असून ते मुंबईतील घाटकोपर येथील शाळेत शिक्षक आहेत. ८० वर्षीय आई, पत्नी आणि तीन मुलांसह ते ठाण्यात राहत असताना ऑगस्ट २०२० मध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह झाले. मात्र, लक्षणे गंभीर नसल्याने आणि त्यांच्या मित्राची खोली रिकामी असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते होमक्वारंटाईन झाले. शासनाच्या नियमावलीनुसार ते १४ दिवस होमक्वारंटाईन होते. त्यानंतर सर्व काही व्यवस्थित सुरू असताना, ते मंगळवारी शाळेत महत्वाचे काम करत असताना अचानक दुपारी साडेबाराच्या सुमारास एक फोन आला. फोन उचलताच समोरून त्यांना एका महिलेने आपण ठाणे महापालिकेतून बोलत असल्याचे सांगितले. तसेच त्यांचे नाव व राहत असलेला पत्ता सांगून त्या महिलेने पहिली खातरजमा केली. तसेच त्यांना त्यांच्या मृत्यूचा दाखला तयार असल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी त्यांना काही क्षणासाठी धक्का बसला. पण, त्यातून ते सावरून मॅडम मी जिवंत आहे. मीच आपल्याशी बोलत आहे असे कथन केले. तेवढ्यात फोन ठेवण्यात आला.

देसाई हे काम संपल्यावर थेट ठाणे महापालिकेत येत कोविड सेंटर रूममध्ये गेले. त्यांनी आलेल्या फोनबाबत संबंधित विभागाच्या एका वरिष्ठ महिला अधिकार्‍यांना माहिती दिली. तसेच आपण जिवंत असल्याचे सांगितले. तेव्हा त्या वरिष्ठ अधिकारी महिलेने आम्हाला आयसीएमआरमार्फत आलेल्या यादीत तुमचे नाव मृतांमध्ये होते. त्यामुळे आपणास फोन करण्यात आला आहे. तसेच त्या अधिकारी महिलेने देसाई यांना त्यांच्या मृत्यूच्या दाखल्याची प्रिंटही काढून दाखवली. तेव्हा देसाईही हबकले.

मृत्यूची तारीख २२ एप्रिल २०२१

देसाई यांना दाखवलेल्या मृत्यूच्या दाखल्याच्या प्रिंटवर त्यांचा मृत्यू २२ एप्रिल २०२१ रोजी म्हणजे ते पॉझिटिव्ह झाल्यानंतर १० महिन्यांनी झाल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांचा मृत्यू हा होमक्वारंटाईन असताना उपचार घेताना झाल्याची स्पष्ट नोंद आहे. त्या अधिकारी महिलेने यामध्ये आमची काही चूक नाही ज्याप्रमाणे यादी आली, त्याप्रमाणे आपल्या मृत्यूचा दाखला तयार करण्यात आल्याचे सांगितले.

घरी रडारड

देसाई हे घरी आल्यावर त्यांनी आलेल्या फोनबद्दल घरच्यांना सांगितले. त्यावेळी त्यांच्या बोलण्याकडे सर्वांचे कान टवकारले आणि त्यांच्या ८० वर्षीय आईपासून सर्वजण रडू लागले. कसेबसे समजूत काढून त्यांना शांत केल्याचे देसाई म्हणाले.

‘मी सरकारी सेवेत आहे. माझ्याबाबत असा प्रकार घडत असेल तर इतरांच्या बाबत विचारही न केलेला बरा. ज्यावेळी फोन आला त्यावेळी नशीब फोन माझ्याजवळ होता. समजा फोन घरी राहिला असता आणि तो फोन आई, पत्नी किंवा मुलांनी घेतला असता तर काय अनर्थ घडला असता, याचा विचारच करवत नाही. असे प्रकार इतरांच्या बाबतीत घडू नयेत म्हणून धाडस करून समोर आलो आहे.’
– चंद्रशेखर देसाई, शिक्षक

‘आयसीएमआर यांच्याकडून कोरोनासंदर्भात माहिती गोळा केली जात आहे. त्यांच्यामार्फत ती माहिती पुण्याच्या आरोग्य विभागाकडे पाठवली जाते. त्यातच पुण्याच्या आरोग्य विभागाकडून आलेल्या माहितीनुसार संबंधितांना फोन केला जातो. यामध्ये महापालिकेची काही चुकी नाही. तरीपण आतापर्यंत केलेल्या कॉलसंदर्भात व्हेरिफिकेशन करण्यात येईल.’
– संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त, ठामपा.

First Published on: June 30, 2021 11:52 PM
Exit mobile version