भिवंडीत घरफोडी करणारा चोर पोलिसांच्या ताब्यात

भिवंडीत घरफोडी करणारा चोर पोलिसांच्या ताब्यात

चोरी! (प्रातिनिधिक फोटो)

भिवंडी तालुक्यातील औद्योगिक वसाहत म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनाळे परिसरात गेल्या महिनाभरापासून चोरट्यांनी घरफोडीच्या घटनांचा उच्छाद मांडला आहे. या चोराट्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून या वाढत्या चोरीच्या घटनांनी तालुका पोलिसांना देखील आव्हान निर्माण केले आहे. रविवारी पहाटे दुकान गाळा मालकाने एका चोरट्याला मोठ्या हिंमतीने रंगेहात पकडून तालुका पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. दुकान मालकाने बहादुरीने चोरट्याला पकडल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

घरफोडी करताना पकडण्यात आलेल्या चोरट्याचे ना व नजमुद्दीन निजामुद्दीन अंसारी असून तो ३० वर्षाचा आहे. सदर चोरट्याने पहाटे २.३० वाजेच्या सुमारास सोनाळे हद्दीतील ओसवाल कंपाऊंडमध्ये असलेल्या मोबाईल एक्सेसरी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडले. कुलूप तोडून आत शिरून आतील सामान चोरून नेण्याच्या प्रयत्नात तो होता. त्यावेळी पंढरपूर यात्रेवरून परतलेले दुकानाचे मालक संतोष राजाराम पाटील यांना चोरट्याची चाहूल लागली. त्यांनी मोठ्या हिंमतीने दुकानात जाऊन चोरटा नजमुद्दीन यास पकडले.

तसेच, या घटनेची माहिती सरपंच विशुभाऊ म्हात्रे यांना दिली. यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चोरट्याला आपल्या ताब्यात घेतले आणि त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. या चोरट्याकडून कटावणी, स्क्रू ड्रॉव्हर, पक्कड आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. या चोरट्याकडून सोनाळे परिसरात चोरीच्या घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल अतिग्रे करत आहे.

दरम्यान पंधरा दिवसापूर्वीच सोनाळे गावातील गोपाल हरड यांच्या घरातून ९० हजार रुपयांची रोकड चोरीस गेली आहे. त्याच रात्री संजय शंकर भोईर यांच्या घरासमोरून युनिकॉर्न मोटार सायकल चोरट्याने पळवली असून या घटनांच्या रात्री गणेश पाटील यांच्या घरात देखील चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. या वाढत्या चोरीच्या घटनांनी ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली वावरत होते. तर चोरीच्या घटना रोखण्यासाठी नागरिकांनी स्वतःच पहारा सुरु केला आहे.

First Published on: July 14, 2019 6:06 PM
Exit mobile version