लसीकरणाचा खर्च केंद्राने उचलावा

लसीकरणाचा खर्च केंद्राने उचलावा

आरोग्य मंत्री राजेश टोपेंची माहिती

कोरोना लसीकरण झाल्यानंतर लाभार्थ्याच्या बोटावर शाई लावली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. शुक्रवारी राज्यभरात लसीकरणाचा ड्राय रन घेण्यात आला असून लसीकरणासाठी आता राज्य सज्ज आहे, असे टोपे म्हणाले. राज्यात फ्रंट लाईनच्या आठ लाख लोकांना पहिल्या टप्प्यात लस दिली जाईल आणि हा कालावधी पूर्ण करण्यासाठी जवळपास अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागेल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी स्पष्ट केले. लसीकरणानंतर लाभार्थ्याची ओळख पटावी म्हणून त्याच्या बोटाला शाई लावणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. लसीकरणाचा हा खर्च मोठा असून, तो केंद्राने उचलला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

लसीकरण हे पूर्णपणे सुरक्षित आहे, असे सांगत तीन महिन्यात लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण होईल. केंद्र सरकार दोन लसींपैकी एकाच कंपनीची लस राज्याला देणार आहे, अशी माहितीही आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली. केंद्र सरकारकडे कोरोना लसीचा खर्च करण्याची मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. एका राज्यात लसीकरण करण्यासाठी एका लसीलाच मंजुरी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवक्सिनच्या लसीला आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. मात्र, एखाद्या राज्यात दोन लसींना लसीकरणासाठी मंजुरी दिल्यास त्याचे रेकॉर्ड ठेवणे अडचणीचे जाईल, असे राजेश टोपे म्हणाले. त्यामुळे कोरोना लसीकरणासाठी एका राज्यात एका लसीला परवानगी दिल्यास रेकॉर्ड ठेवणे सोपे जाईल, गोंधळ निर्माण होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लस आणि लसीकरणाचा खर्च केंद्राने करावा
भारत सरकारने दोन लसींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. मात्र, देशातील परिस्थिती पाहता केंद्र सरकारने लस आणि लसीकरणाचा खर्च करण्यासाठी खर्च करण्याची मागणी राजेश टोपे यांनी केली. गरिबांना लस देण्यासाठी केंद्राने खर्च उचलणे गरजेचे आहे. कोरोना लसीचा साठा, लस साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेजचा खर्च आणि लसीकरण करण्यासाठी लागणार्‍या मनुष्यबळाचा खर्च केंद्र सरकारने द्यावा, अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्याकडे केल्याचे राजेश टोपेंनी सांगितले.

राज्यात ड्राय रन
केंद्र सरकारच्या आदेशानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ड्राय रनचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. महाराष्ट्रात 2 जानेवारीला पुणे, नागपूर, जालना, नंदूरबारमध्ये ड्राय रन पार पडले होते.

First Published on: January 9, 2021 7:05 AM
Exit mobile version