महाविकास आघाडीचे धोरणात्मक निर्णय शरद पवारांच्या मर्जीने होणार

महाविकास आघाडीचे धोरणात्मक निर्णय शरद पवारांच्या मर्जीने होणार

शरद पवार यांची टीका

राज्यात सध्या कोरोनाच्या संकटकाळात महाविकास आघाडीमध्ये नाराजीनाट्य रंगले असल्याच्या बातम्या येत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार सध्या कमालीचे नाराज आहेत. आता महाविकास आघाडीमधील सर्व धोरणात्मक निर्णय हे शरद पवार यांच्या मर्जीनेच होणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला सर्वाधिक १०५ जागा जिंकूनही राज्यात सत्ता स्थापन करता आली नाही. मात्र, याचवेळी महाविकास आघाडी स्थापन होण्यामागे शरद पवार यांनी आणि शिवसेना राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मोलाची भूमिका बजावली होती. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू असल्याने शरद पवार नाराज झाले असून, महाविकास आघाडीची बिघडलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी शरद पवार पुन्हा मैदानात उतरले आहेत. याचमुळे यापुढे महाविकास आघाडीमधील धोरणात्मक निर्णय हे फक्त आणि फक्त शरद पवार यांच्या मर्जीने होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.

शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची नुकतीच मातोश्रीवर बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जे वाद असतील ते समोरा समोर बसून सोडवा तसेच कोणतेही वाद बाहेर येऊ देऊ नका, असे शरद पवार यांनी सांगितल्याचे कळते. दरम्यान, काही अधिकार्‍यांची मनमानी, मंत्र्यांना विश्वासात न घेता निर्णय घेणे, तसेच अजोय मेहता यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधान सल्लागारपदी ठेवल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नाराज आहेत. याचमुळे शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीत यापुढे तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांना विचारात घेऊन निर्णय घ्या, असे सांगितल्याचे कळते.

First Published on: July 9, 2020 6:49 AM
Exit mobile version