हॉस्पिटल बंदप्रकरणी पालिका आयुक्तांशी चर्चेनंतरच घेणार निर्णय

हॉस्पिटल बंदप्रकरणी पालिका आयुक्तांशी चर्चेनंतरच घेणार निर्णय

वर्षभरापासून डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचारी मानसिक व शारीरिक तणावाखाली काम करत आहेत. त्यांना आता विश्रांतीची गरज आहे. दुर्दैवाने शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यास पुन्हा कोरोना रुग्णसेवा  देण्यास बांधिल असू, असे सांगत हॉस्पिटल ओनर्स असोसिएशन ऑफ नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी कोविड सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाला प्रशासनाने कडाडून विरोध केल्यानंतर डॉक्टरांनी पुन्हा आपल्या भूमिकेबाबत महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगितले. दुपारी ४ वाजता पालिका आयुक्तांसोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.

हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रमाकांत पाटील यांनी खासगी रुग्णालयांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत तक्रारींचा पाढा वाचला. शासनाने कोविड सेवेसाठी खासगी रुग्णालयांचे दर निश्चित करून दिले आहेत. त्यानुसार आम्ही सेवा देण्यास कटिबद्ध आहोत. परंतू, ऑक्सिजन, रेमडेसिवीर अशा अत्यावश्यक औषधोपचारांसह साधनांच्या उपलब्धतेची जबाबदारी शासनाने घ्यावी. एरव्ही, २२०० रुपयांना मिळणारा ऑक्सिजन टँक आता तब्बल १७ हजारांना मिळत असल्याने, रुग्णांना शासकीय दरांत उपचार कसे देणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच, सोशल मीडियांद्वारे रुग्णालयांची नाहक बदनामी होत असल्याने डॉक्टरांचे खच्चीकरण करण्याचाच हा प्रकार आहे. म्हणून नियमांनुसार अशा घटकांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही डॉ. पाटील यांनी केली. काही दिवसांपूर्वी बिलावरुन घडलेल्या प्रकाराबाबत आम्ही वोक्हार्ट हॉस्पिटलला संघटनेच्या वतीने नोटिसदेखील बजावली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांसोबत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

First Published on: June 2, 2021 3:54 PM
Exit mobile version