येत्या दोन दिवसांत निर्णय होणार, तंत्र आणि उच्च शिक्षणमंत्री उदय सामंतांचे संकेत

येत्या दोन दिवसांत निर्णय होणार, तंत्र आणि उच्च शिक्षणमंत्री उदय सामंतांचे संकेत

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागलाय. डेल्टानंतर ओमिक्रॉननं जनतेची डोकेदुखी वाढवलीय. तर आजपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणास सुरुवात होत आहे. या अनुषंगाने इयत्ता ९ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या लसीकरण नियोजनाचा आढावा घेण्यात येतोय. आता तंत्र आणि उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत येत्या दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचं सांगितलंय.

आज कुलगुरू महोदयांबरोबर बैठक झाली. त्याच्यामध्ये आम्ही निर्णयाप्रत आलो नाही. आज आम्ही परत एकदा बैठक घेणार आहोत. पण कुलगुरू महोदयांनी सांगितलं की, दोन दिवसांमध्ये घेऊया. विशेषतः ती जी बैठक होणार आहे, ती विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि कुलगुरू अशी ती बैठक दोन दिवसांत होणार आहे. त्यामध्ये निर्णयाप्रत यावं लागेल, असं कुलगुरूंचं म्हणणं आहे, असंही उदय सामंत यांनी अधोरेखित केलंय.

विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा कल हा ऑनलाईनकडे आहे की ऑफलाईनकडे यावरही जोरदार चर्चा सुरू झालीय. कोरोना पसरण्याचा वेग पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा फार मोठ्या पद्धतीने आहे. काही तरी निर्णय घ्यावे लागतील. विद्यार्थ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यावी लागेल, पालकांचे संरक्षणही घ्यावे लागेल. पण ते काय आणि कसे घ्यायचे आहेत हे आम्ही अजून ठरवलेलं नाही, असंही उदय सामंत म्हणालेत.

दुसरीकडे कोविड 19 विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम अंतर्गत, 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे विनामूल्य लसीकरण करण्याची मोहीम आजपासून 3 जानेवारी 2022 पासून सुरू होत आहे. मुंबईतील 9 केंद्रांवर 15 ते 18 वयोगटातील मुलांना लस दिली जात आहे.

15 ते 18 वयोगटातील मुलांना लस देणाऱ्या लसीकरण केंद्राची यादी

रिचर्डसन क्रूडास भायखळा कोविड लसीकरण केंद्र
शीव (सायन) येथील सोमय्या मैदानावरील जम्‍बो कोविड लसीकरण केंद्र
वरळीतील एनएससीआय डोम जम्‍बो कोविड लसीकरण केंद्र
वांद्रे-कुर्ला संकुलातील बीकेसी जम्‍बो कोविड लसीकरण केंद्र
गोरेगाव (पूर्व) मधील नेस्‍को जम्‍बो कोविड लसीकरण केंद्र
मालाड (पश्चिम) मधील मालाड जम्‍बो कोविड लसीकरण केंद्र
दहिसर जम्‍बो कोविड लसीकरण केंद्र
कांजूरमार्ग (पूर्व) मधील क्रॉम्‍प्‍टन ऍण्ड ग्रीव्‍हस् जम्‍बो कोविड लसीकरण केंद्र
मुलूंड (पश्चिम) मधील रिचर्डसन क्रूडास मुलूंड जम्‍बो कोविड लसीकरण केंद्र
या व्यतिरिक्त परळमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रुग्णालय येथे रेल्वे कर्मचार्‍यांच्या १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी देखील लसीकरण केंद्र आहे.

 

First Published on: January 3, 2022 3:17 PM
Exit mobile version