निर्जन स्थळे, भग्न इमल्यांमुळे अत्याचारांची मालिका

निर्जन स्थळे, भग्न इमल्यांमुळे अत्याचारांची मालिका

डोंबिवली : डोंबिवली, ठाकुर्ली आणि कल्याणमधील निर्जन ठिकाणे, रेल्वेच्या जागेवर असलेल्या भग्न इमारती भिकारी, गर्दुल्ले, गुंड-गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान झाली आहेत. त्यामुळे पोलीस असल्याची बतावणी करून दोघा नराधमांनी मिळून एका सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार केल्याची घटना ठाकुर्ली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील गर्द झाडीत घडली. यापूर्वीही अशाच निर्जनस्थळी वा भग्न इमारतींमध्ये अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे यातून बोध घेवून ठोस उपाययोजना न केल्यास शक्ती मिल कंपाऊंड सामुहिक अत्याचाराच्या घटनेची डोंबिवलीत पुनारावृत्ती घडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

कल्याण डोंबिवली परिसराला निसर्गरम्य असा खाडी किनारा लाभला आहे. मात्र केडीएमसी वा राज्य शासनाने हा खाडी किनारा विकसित न केल्याने तेथे झाडे झुडपे मोठ्या प्रमाणावर वाढली असून त्यामुळे ते एक निर्जन स्थळ झाले आहे. दुसरीकडे ठाकुर्ली येथील ५२ चाळ परिसरात रेल्वेचे जुने पडीक बंगले, क्वार्टर्स आणि बैठ्या चाळी आज भग्नावस्थेत आहेत. या जागांचा वापर अनैतिक कृत्य करण्यासाठी आणि गुन्हेगारी कारवाया करण्यासाठी होत असल्याचे दिसून येते. याच पडक्या घरांच्या परिसरात गर्दुल्ले, गुंड, दारूडे आणि अनैतिक धंदे करणाऱ्यांनी आपला अड्डा जमवला आहे. त्यांच्या उपद्रवामुळे परिसरातील रहिवाश्यांमध्ये व नागरिकांमध्ये कायम दहशतीचे वातावरण आहे.

बावन्न चाळ परिसरातील पडीक बंगले वा इमारती पाडण्यात यावी, यासाठी मनसेचे डोंबिवली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे यांनी गेली ५ वर्षे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे अनेक भग्न इमारती रेल्वे प्रशासनाने पाडण्याची कारवाई केली असली तरी अजूनही अनेक इमारती शिल्लक आहेत. मुंबईतील बंद पडलेल्या शक्ती मिल परिसरात झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेनंतर अशी निर्जन ठिकाणे सुरक्षित करण्यासाठी मुंबई पोलिसांनी काही उपाययोजना राबवल्या. मात्र कल्याण-डोंबिवलीतील सुरक्षा यंत्रणांनी मुंबईतील शक्ती मिल सामूहिक बलात्काराच्या घटनेपासून धडा घेण्याचा अजिबात प्रयत्न केलेला दिसून नसल्याचे दिसून येते. कल्याण, डोंबिवली आणि ठाकुर्लीतील अशा निर्जनस्थळांवर चोर, गुंड, मवाली, गर्दुल्ले आणि गुन्हेगारांनी कब्जा केला आहे.

एप्रिल २०१८ मध्ये कल्याण पूर्वेत स्टेशन जवळील बोगद्यात विनोद सुर्वे या प्रवाशाची बोगद्याच्या भिंतीवर डोके आपटून हत्या करण्यात आली होती. उरण येथून काम आटोपून रात्री उशिरा घरी परतणाऱ्या सुर्वे यांची लुटमार करण्याच्या हेतूने गर्दुल्ल्यांनी हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. जुलै २०२१ रोजी पहाटेच्या सुमारास कल्याण पश्चिमेतील सुभाष चौकात असलेल्या निर्जन बंगल्यात नेऊन एका मूकबधिर तरुणीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली होती. याशिवाय ५२ चाळ परिसरात खून केल्याच्या वा खून करून शव टाकून दिल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.

भारतीय रेल्वेची भुसावळनंतरची सर्वात मोठी जागा कल्याण व ठाकुर्ली पॉवर हाऊस परिसरात आहे. याच ठिकाणी रेल्वेच्या वास्तू असून त्यातील बहुसंख्य इमारती,बैठे बंगले वापराविना पडून आहेत. रेल्वेने त्यांच्या या निर्जन आणि भग्न इमारतींचे अवशेष असलेल्या प्रांतात रायफल्सधारी सुरक्षा रक्षक तैनात करण्याची व विद्युत प्रकाश झोताची व्यवस्था करणे आवश्यकत आहे . केवळ गुन्हेगारच नव्हे तर या भागात भटकायला जाणाऱ्या प्रत्येक तरूण-तरूणीला रोखायला हवे. ठाकुर्लीत घडलेल्या घटनेत दोघांनी मिळून एका तरूणीवर अत्याचार केला. मात्र अशा अनेक घटना घडल्या असतील कि केवळ बदमानी होईल म्हणून समोर आल्या नसाव्यात .एखाद दिवशी मुंबईत झालेल्या शक्ती मिल सामूहिक अत्याचाराची पुनरावृत्ती कल्याण डोंबिवलीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही ,अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे .

First Published on: January 30, 2023 10:24 PM
Exit mobile version