Video: मास्क नव्हता म्हणून हटकले; चालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवरुन फिरवलं

Video: मास्क नव्हता म्हणून हटकले; चालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवरुन फिरवलं

पिंपरी चिंचवडमध्ये एका वाहतूक पोलिसाच्या अंगावर गाडी घालण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. वाहतूक पोलिसाने मास्क का घातला नाही, अशी विचारणा केली म्हणून पोलिसाच्या अंगावर गाडी घातली आणि बोनेटवर घेऊन पोलिसाला १ किलोमीटर पर्यंत नेले. दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांच्या प्रसंगावधानपणा दाखवल्याने त्यांचा जीव वाचलाय. हा थरार मोबाईल कॅमेरा आणि सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

पिंपरी चिंचवड येथे सायंकाळी चारच्या सुमारास अहिंसा चौकात वाहतूक पोलीस आबासाहेब सावंत आणि इतर कर्मचारी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत होते. चिंचवड स्टेशन चौकाकडून चाफेकर चौकाकडे ५० वर्षीय युवराज हणवते त्यांच्या चारचाकीतून निघाले होते. पण त्यांनी घातलेला मास्क हा नाक आणि तोंड सोडून गळ्याजवळ असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. चालकाने मास्क न घातल्याने पोलिसाने कार थांबवण्याचा इशारा केला. कारचालक थांबत नसल्याने पोलीस आपल्या परीने कार थांबवण्याचा प्रयत्न करत होता मात्र चालकाने कार तशीच पुढे नेली. त्यामुळे वाहतूक पोलीस आबासाहेब सावंत गाडी समोर आले आणि गाडी थांबवली. हणवतेंनी थोडावेळ थांबलोय, असं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा गाडी चालू केली. यावेळी सावंत यांच्या पायाला धक्का लागला आणि बोनेटच्या दिशेने तोल गेला. बोनेट वरून खाली उतरणार तोवर हणवते यांनी गाडीचा वेग वाढवला आणि तब्बल १ किमी पर्यंत पोलिसाला बोनेटवरुन बसवून नेले.

ही घटना दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांनी पाहिली. मग हणवतेच्या गाडीचा फिल्मी स्टाईल पाठलाग सुरू झाला. काही क्षणातच अहिंसा चौकातून हणवते चाफेकर चौकात पोहचले, मग हणवते यांनी गाडीचा वेग आणखीच वाढवला. गाडी चिंचवड पोलीस स्टेशनसमोर आली, तेव्हा दोन्ही बाजूंनी दोन दुचाकीस्वार, पुढे एक रिक्षा असे घेरण्यात आले. पण चारचाकी सुसाट होती. सावंत जीव मुठीत घेऊन बोनेटला कसेबसे धरून बसले होते. काही केल्या हणवते थांबण्याचे नाव घेत नव्हते, शेवटी एक दुचाकीस्वाराने शक्कल लढवली आणि पुढे धावणारी मोठी चारचाकी गाडी रस्त्यात थांबवली. तेव्हा कारचालकालागाडी थांबवावी लागली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही आणि मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

दुचाकीस्वार, रिक्षाचालक यांचा प्रसंगावधान आणि सुदैव म्हणूनच सावंत यातून बालबाल बचावले. त्यांच्या पायाला मात्र गंभीर इजा झाली आहे. जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी, तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने हणवतेवर चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. हणवते हे पिंपळे निलख येथील रहिवाशी असून पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

First Published on: November 6, 2020 9:43 AM
Exit mobile version