अनिल देशमुखांच्या दोन्ही मुलांच्या कंपन्यांची ईडी चौकशी करणार

अनिल देशमुखांच्या दोन्ही मुलांच्या कंपन्यांची ईडी चौकशी करणार

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन ईडीने गुन्हा दाखल केला आहे. ईडीच्या कारवाईपाठोपाठ अजून एक झटका देशमुख यांना बसू शकतो. सीबीआयच्या रडारवर असलेल्या अनिल देशमुख यांच्या दोन मुलांच्या कंपन्यांची ईडी चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख आणि ऋषिकेश देशमुख यांचे शेअर्स असलेली झोडियाक डेलकॉम या कंपनीची चौकशी होण्याची शक्यता आहे.

झोडियाक डेलकॉम प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी कोलकाता येथे असून २०१९ साली ऋषिकेश देशमुख आणि सलील देशमुख यांनी ती विकत घेतली होती. देशमुख यांचे पुत्र चालवत असलेल्या अयती जेम्स, काँक्रीट रियल इस्टेट, अटलांटिक विस्टा रियल इस्टेट आणि काँक्रीट इंटरप्रासेस या कंपन्यांच्या माध्यमातून २०१९ साली झोडियाक डेलकॉम कंपनी विकत घेण्यात आली होती. झोडियाक डेलकॉम कंपनीचे व्यवहार याआधी सीबीआयने पडताळले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर पुन्हा एकदा ईडीकडूनही त्याची तपासणी होऊ शकते.

अनिल देशमुख यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल

अनिल देशमुखांविरोधात पैशाची अफरातफर केल्याचा आरोप करत ईडीकडूनही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने नोंद केलेल्या गुन्ह्याच्या आधारेच ईडीने गुन्हा दाखल केल्याचं सांगण्यात येतंय. शंभर कोटी वसुली प्रकरण तसेच बदल्यांसाठी पैसे घेण्यात आल्याच्या प्रकरणानंतर या पैशाचं नेमकं झालं काय याचा तपास ईडी करणार आहे. या पैशांचा वापर कसा करण्यात आला आहे, हवाला मार्फत ते बाहेर पाठवण्यात आले आहेत का किंवा कोलकात्यातील शेल कंपन्यांच्या माध्यमातून त्याची गुंतवणूक केली गेली आहे का या सर्वांचा तपास आता ईडी करणार आहे.


हेही वाचा – अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, CBI नंतर ईडीकडून गुन्हा दाखल


 

First Published on: May 11, 2021 4:13 PM
Exit mobile version