शेतकऱ्याची शक्कल! अतिवृष्टीपासून बचावासाठी शेळयांना घातले अनोखे ‘रेनकोट’

शेतकऱ्याची शक्कल! अतिवृष्टीपासून बचावासाठी शेळयांना घातले अनोखे ‘रेनकोट’

नाशिक : उत्तर महाराष्ट्रात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला आहे. मात्र, आदिवासी पट्ट्यात डोंगर माथ्यावर पावसाचा चांगला जोर असल्याचे दिसून येतो. सतत पडणाऱ्या पावसामुळे जसे मानवी जीवन विस्कळीत होते. तसेच प्राण्यांनाही अति मुसळधार पावसाचा त्रास होत असतो. त्यांनाही आजारांना सामोरे जावे लागते. आपल्या जवळील पाळीव शेळयांचे मुसळधार पवसापासून संरक्षण व्हावे यासाठी एका आदिवासी शेतकऱ्याने भन्नाट शक्कल लढवली आहे. या शेतकऱ्याने आपल्या शेळयांसाठी एका अनोख्या ‘रेनकोट’ची व्यवस्था केलीये.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या मुळा प्रवरा पट्ट्यात होणाऱ्या अति मुसळधार पाऊस, वारा आणि थंडी यामुळे प्राण्यांचे रक्षण करण्यासाठी येथील आदिवासी शेतकऱ्यांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते. विशेषतः छोट्या प्राण्यांना त्याचा जास्त त्रास होतो. त्यामुळे पाऊस आणि थंडीपासून शेळ्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी आदिवासी शेतकरयांनी वेगळीच शक्कल लढवली आहे. खताच्या प्लॅस्टिकच्या गोण्यांचा वापर करून शेळ्या पावसात भिजू नये आणि थंडी वाजू नये म्हणून रेनकोट तयार करण्यात आले आहेत.

अकोले तालुक्यातील आदिवासी पट्ट्यातील बहुसंख्य ठाकर समाजातील कुटुंबे शेळीपालन हा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करीत असतात. तालुक्यातील पश्चिमेकडील आदिवासी पट्टा असलेल्या अतिदुर्गम घाटघर, उडदावणे, पांजरे, कुमशेत, पाचनई आणि आजूबाजूच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेळीपालन करणारे आदिवासी शेतकरी आहेत. पावसाळ्यात प्रचंड थंडी आणि वारा, मोठ्या प्रमाणावर पडणारा पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणावर शेळ्या मरण पावतात.

थंडी आणि पावसापासून बचाव होण्यासाठी शेळ्यांच्या पाठीवर खतांच्या मोकळ्या गोण्या धुवून स्वच्छ केल्यानंतर त्यापासून बनवलेले रेनकोट प्रत्येक शेळीला बांधण्यात आलेले आहेत. ही शक्कल येथील शेळी पालकांनी शोधली आहे. यामुळे पावसाचे पाणी शेळ्यांच्या शरीरावर केसांमध्ये न अडकता निथळून खाली पडते. त्यामुळे शेळ्यांचे पावसात ओले होण्याचे प्रमाण कमी होते, शिवाय थंडीसुद्धा जाणवत नाही. आदिवासी ठाकर समाजातीलही गरीब कुटुंबे माणसांप्रमाणेच शेळ्यांनाही संरक्षण देताना दिसत आहेत. सध्या सर्वत्र रेनकोट घातलेल्या शेळ्यांचे कळप दिसत आहेत. त्यामुळे जोरदार पाऊस पडत असूनही शेळ्यांना चारा खाण्यासाठी जंगलात फिरवता येत आहे.

First Published on: July 24, 2023 7:33 PM
Exit mobile version