माजी महापौर हे आता सर्वसामान्य नागरिक, त्यांना महापालिकेतील कार्यालय वापरण्यास बंदी घालावी

माजी महापौर हे आता सर्वसामान्य नागरिक, त्यांना महापालिकेतील कार्यालय वापरण्यास बंदी घालावी

ठाणे : ठाणे महापालिकेतील महापौर व सर्व नगरसेवक यांचा कार्यकाल सुमारे एक वर्षापूर्वी संपल्याने आता ते सर्वसामान्य नागरिक झाले आहेत. परिणामी महापालिकेमध्ये पक्ष कार्यालयात ठाण मांडून बसणाऱ्या माजी महापौर व नगरसेवकांना एक तर कार्यालय बंदी करावी. येत्या आठ दिवसांत ठाणे महानगरपालिकेतील सर्व पक्ष कार्यालय व महापौर दालन, महापौर निवास बंद न केल्यास करदाते ठाणेकर नागरिकांना घेऊन महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी पालिका आयुक्तांना दिला आहे.

ठाणे महानगरपालिकेची मुदत फेब्रुवारी २०२२ मध्ये संपलेली असताना सुद्धा माजी महापौर व सत्ताधारी पक्षाचे माजी नगरसेवक हे आजही नगरसेवक असल्यासारखे वागतात. सर्व माजी नगरसेवक हे आता सर्वसामान्य नागरिक असून सामान्य जनतेप्रमाणेच ते केवळ महापालिकेत कामासाठी येऊ शकतात. परंतु माजी महापौर व माजी नगरसेवक हे आजही पालिकेतील पक्ष कार्यालयात ठाण मांडून बसलेले दिसतात. महापालिका मुख्यालयातील महापौर दालन हे तातडीने बंद करण्यात यावे अशी मागणी २ महिने अगोदरच मी लिखित केलेली आहे. मात्र यावर पालिका आयुक्त यांनी अद्याप कोणताच निर्णय घेतला नसल्याने एक तर या माजी नगरसेवकांना पालिका मुख्यालयाचा ताबा घेण्यापासून रोखावे अन्यथा सर्वसामान्य ठाणेकर जनतेला पालिका मुख्यालयात येऊन कार्यालयात बसण्याची परवानगी द्यावी. येत्या आठ दिवसात याबाबत निर्णय न घेतल्यास सर्वसामान्य जनतेला घेऊन ठाणे महापालिका मुख्यालयात घुसणार असा इशाराच संजय घाडीगावकर यांनी दिला आहे.

 

First Published on: January 15, 2023 10:41 PM
Exit mobile version