खालापूरला गरज सुसज्ज रुग्णालयाची

खालापूरला गरज सुसज्ज रुग्णालयाची

तालुक्याचा पसारा वाढत असून विकासाकडे वेगाने वाटचाल होत असली तरी येथील आरोग्य सेवा मात्र कुबड्यांच्या आधाराने कशीबशी खुरडत चालत आहे. उपचारासाठी आजही पुणे, मुंबई गाठावी लागते. त्यामुळे येथे सुसज्ज रुग्णालयाची प्रकर्षाने गरज निर्माण झाली आहे.

द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, चार राज्य मार्ग असे अंतर्गत दळणवळणाचे जाळे, तीनशेच्यावर कारखाने यावरून या तालुक्याच्या व्यस्ततेचा अंदाज येतो. तालुक्यात दिवसाला सरासरी तीन अपघात होत असून, महिन्याला सुमारे शंभरचा आकाडा पार होतो. यामध्ये रस्ते अपघाताची सर्वात चिंताजनक आकडेवारी असून वेळेत उपचाराअभावी मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. अपघातानंतर तातडीच्या उपचारासाठी सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज रुग्णालय येथे नाही. त्यामुळे रुग्णाला पनवेल, नवी मुंबई किंवा पुण्याला हलवावे लागते. तालुक्यातील शासकीय आरोग्य सेवा प्रथमोपचारापुरती मर्यादित आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांत सर्वच ठिकाणी डॉक्टर, कर्मचारी यांची संख्या अपुरी आहे. आरोग्य केंद्रात सोयी स्वच्छतेचा अभाव, तसेच अत्यावशक औषधांचा तुटवडा आहे. हे भीषण वास्तव समोर आल्यानंतरदेखील सुधारण्यासाठी प्रयत्न होत नाहीत.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अशा अवस्थेमुळेच रुग्णाला इतरत्र हलवावे लागते. खोपोली, चौक व रसायनी परिसरात डझनभर खासगी दवाखाने असले तरी तपासणीकरिता अत्याधुनिक यंत्रसामग्री, कुशल तंत्रज्ञ यांची वानवा आहे. त्यामुळे गंभीर जखमी रुग्णाला वाचविण्यासाठी येथील डॉक्टरदेखील रुग्णाला तातडीने मोठ्या रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देतात. खालापुरात मध्यवर्ती ठिकाणी असलेले लोधीवली येथील अंबानी रुग्णालय काही वर्षे अपघातग्रस्तांना वरदान होते. परंतु आता या रुग्णालयाला अखेरची घरघर लागली असून ते बंद होण्याच्या मार्गावर आहे.

लोधीवली रूग्णालय बंद होऊ नये यासाठी लोधीवली ग्रामपंचायतीने पाठपुरावा सुरू ठेवला असून या भागात हे एकमेव मोठे रुग्णालय आहे. – अमोल सांगळे, ग्रामस्थ, लोधीवली

First Published on: June 20, 2019 3:26 AM
Exit mobile version