शिंदे गट आणि भाजपामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, ठाण्यात दोन्ही पक्षातील पदाधिकारी भिडले

शिंदे गट आणि भाजपामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, ठाण्यात दोन्ही पक्षातील पदाधिकारी भिडले

ठाणे – एकनाथ शिंदे गट आणि भाजपातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. ठाण्यात शिंदे गटातील माजी नगरसेवकाच्या सागंण्यावरून भाजपाच्या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अद्यापही तक्रार झाली नसली तरीही भाजपाने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

ठाण्यातील परबवाडी येथे गुरुवारी फलक बसवण्याच्या कारणावरून शिंदे गटातील पदाधिकारी आणि भाजपाचे पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यात वाद झाला. या वादात पोलिसांनी मध्यस्ती करत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना समज दिली. मात्र, शुक्रवारी सायंकाळी १५ ते २० जणांच्या जमावाने प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात प्रशांत जाधव यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शिंदे गटाचे माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता भोसले यांच्या सांगण्यावर हा हल्ला झाला असल्याचा आरोप भाजपा कार्यकर्त्यांनी केला आहे. याबाबत भाजप ठाणे या खात्यावरून ट्विटही करण्यात आले आहे. रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आळा नव्हता.

दरम्यान, दोन्ही पक्षात आलबेल नसल्याचं सातत्याने समोर आलं आहे. ठाण्यात दोन्ही पक्षातील अंतर्गत वाद अनेकदा समोर आले आहेत. त्यातच हा हल्ला झाल्याने शिंदे गट आणि भाजपाकडून संयुक्तरित्या काय कार्यवाही केली जाते हे पाहावं लागणार आहे.

First Published on: December 31, 2022 7:50 AM
Exit mobile version