बालिकेचे अपहरण करणारा अखेर ताब्यात

बालिकेचे अपहरण करणारा अखेर ताब्यात

जिल्हा रूग्णालयातून शनिवारी अपहरण झालेल्या दीड वर्षाची चिमुकला शोध लागला असून ही चिमुकली सीबीएस परिसरात सोडून देत अपहरणकर्ता फरार झाला आहे. पहाटेच्या सुमारास सरकारवाडा पोलिसांना ही चिमुकली बालिका आढळून आली. सरकारवाडा पोलिसांनी लागलीच तपास चक्र फिरवत अपहरणकर्त्याला ताब्यात घेतले आहे.

गौरी भोला गौड (दिड वर्ष, रा. ठाणे, मुंबई) असे अपहरण झालेल्या बालिकेचे नाव आहे. चोरीला गेलेली गौरी ही बालिका मूळची उत्तर प्रदेशातील असून, आई वडिलांसमवेत ठाण्यातील रबाले परिसरात राहाते. तिची मावशी अंबड परिसरात राहावयास आहे. तिला प्रसूतीसाठी दाखल करावयाचे असल्याने या बालिकेला घेऊन तीची आई संगीता ही शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास जिल्हा रुग्णालयात आल्या होत्या. तेव्हापासून ते दुपारी एक पर्यंत त्यांचा कागदपत्र जमवण्यात वेळ गेला. दरम्यान सर्व कागदपत्रे जमवुन अखेरीस बहिणीला प्रसुती कक्षात दाखल करण्याचे प्रयत्न सुरू असताना त्याचवेळी मुलगी झोपल्याने संगिता यांनी तिला प्रसूती कक्षाबाहेर झोपवले व तेथे बसलेल्या व्यक्तीस बालिकेकडे लक्ष देण्यास सांगीतले. दुपारी सव्वा ते दीडच्या सुमारास त्या प्रसुती कक्षा बाहेर आल्यानंतर त्यांना मुलगी दिसली नाही म्हणून सर्वत्र शोधाशोध केली. मात्र ती आढळून आली नाही. अखेरीस रूग्णालय प्रशासनास विनंती करून रुग्णालयातील सिसिटीव्ही तपासले असता ज्या व्यक्तीस मुलीकडे लक्ष देण्यास सांगीतले तोच व्यक्ती मुलीला खांद्यावर झोपवून घेऊन जाताना आढळला. याप्रकरणी संगिता गौड यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली . सरकारवाडा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकासह आणखी दोन पथके तपासासाठी तैनात केली होती.

दरम्यान या बालिकेचे अपहरण करणार्‍यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. प्राथमिक माहितीनूसार सदरील व्यक्ती हा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कामाला आहे. त्याने या बालिकेचे अपहरण का केले, संबधितांशी त्यांचे काही नातेसंबंध आहेत काय याबाबत पोलीस तपास सुरू आहे.

First Published on: February 16, 2021 11:48 AM
Exit mobile version