कविता; तलवारीपेक्षाही धारधार शस्त्र – वा. ना. आंधळे

कविता; तलवारीपेक्षाही धारधार शस्त्र – वा. ना. आंधळे

कार्यक्रमाच्या शुभारंभातील दिपप्रज्वलनाचा क्षण

अन्यायाविरोधात वाचा फोडण्यासाठी कविता हे तलवारीपेक्षाही धारधार शस्त्र असल्याचे ज्येष्ठ साहित्यिक वा. ना. आंधळे यांनी रविवारी दोंडाईचा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘रिमझिम काव्यसंमेलना’च्या अध्यक्षीय भाषणात म्हटले. कविता ही प्रत्येक व्यक्तीमध्ये संचारलेली असते. फक्त त्या गुणाचा साक्षात्कार होऊन तो गुण विकसित करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी नवोदित कविंना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उदाहरणे दिले. त्याचबरोबर आपल्यात कवितेविषयीची जागरूकता निर्माण करणारे दुसरे तिसरे कुणी नसून प्राथमिक शाळेतील गुरूजण असल्याचेही त्यांनी सांगितले. खान्देश साहित्य मंचच्या दोंडाईचा अध्यक्षा ज्येष्ठ कवयित्री लतिका चौधरी आणि शिंदखेडयाचे तहसीलदार सुदाम महाजन यांच्या संयुक्त विद्यमानाने या अवाढव्य अशा ‘रिमझिम काव्यसंमेलना’चे आयोजन करण्यात आले होते.

कवितेच्या वर्षावात श्रोते न्हाऊन निघाले

या साहित्य संमेलनात अहिराणी साहित्याचे गाढे अभ्यासक बापूसाहेब हटकर, खान्देश साहित्य संघाचे अध्यक्ष सदाशिव सुर्यवंशी, सुप्रसिद्ध लेखक रमेशजी बोरसे, कवयित्री सुनिता पाटील, शाहिर नाना पाटील, कवी त्रिवेणीकुमार पाटील, डॉ. एस. के. पाटील, कवी नाना महाजन, मावळतीचे रंग सदराचे लेखक बापूसाहेब भामरे तसेच साहित्य क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तीमत्व उपस्थित होते. दरम्यान, आषाढी सरींमध्ये कवितेच्या विविध छटांच्या वर्षावामध्ये श्रोते न्हाऊन निघाले. कवयित्री प्रियंका पाटील, कवी रमेश धनगर आणि कवी शरद धनगर यांनी या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची धुरा सांभाळली.

संमेलनाला सकारात्मक प्रतिक्रिया

संमेलनात सहभागी झालेल्या प्रत्येक कविंनी आपल्या प्रतिक्रिया विविध माध्यमांनी दिल्या आहेत. त्यात कवी देवदत्त बोरसे यांनी फार बोलकी प्रतिक्रिया दिली. देवदत्त म्हणाले की, ‘फळांनी बहरलेल्या वृक्षाकडे जसा पक्षांचा थवा धाव घेतो अगदी तसेच आपल्या शब्दसुमनांनी काव्यविहारात रमणाऱ्या काव्यरसिकांना जिंकणाऱ्या सुस्वभावी अशा काव्यसंमेलनाच्या आयोजक नामवंत लेखिका लतिकाताई चौधरी यांनी यशस्वीरित्या हा काव्यमेळावा पार पाडला. कवयित्री प्रियंकाताई पाटील, कवी रमेश धनगर आणि कवी शरद धनगर यांचे सुत्रसंचलन म्हणजे विहंगम आनंद देणाऱ्या शब्दसरितांचा त्रिवेणी संगमच होता’.

काव्यक्षेत्रातले दिग्गज साहित्यिक आणि खान्देशभुमीतल्या उभरत्या काव्य वारकरींच्या काव्यसुमनांनी दोंडाईचा नगरी जणू काही आषाढधारात प्रति काव्यपंढरीच काव्यरसिकांनी याचि देहि याचि डोळा पाहिले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर खान्देश हित संग्राम संघटनेचे प्रवक्ते सुरेश पाटील यांनी कार्यक्रम आयोजक लेखिका लतिका चौधरी आणि शिंदखेड्याचे तहसिलदार सुदाम महाजन यांचे अप्रूप वाटत अल्याचे सांगितले.

First Published on: July 24, 2018 4:39 PM
Exit mobile version