सर्वधर्मियांसाठी मशीद खुली

सर्वधर्मियांसाठी मशीद खुली

आझम कॅम्प परिसरातील एक मशीद सर्वधर्मीय नागरिकांना पाहण्यासाठी खुली ठेवण्यात आली आहे

मुस्लीम धर्माविषयी, मुस्लीम समाजातील रूढी, परंपरांविषयी, धार्मिक स्थळ असलेल्या मशिदीविषयी सर्वसामान्य नागरिकांच्या मनात असलेले गैरसमज दूर व्हावेत. यासाठी ‘जमाते-इस्लामी इस्लामिक इन्फॉर्मेशन सेन्टर’ यांच्यावतीने पुण्यात एका उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत आझम कॅम्प परिसरातील एक मशीद सर्वधर्मीय नागरिकांना पाहण्यासाठी खुली ठेवण्यात आली आहे.

या उपक्रमाचे आयोजक शेख करीमुद्दीन यांनी सांगितले की, इस्लाम धर्म काय आहे, मशिदीमध्ये नेमके काय चालते, याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी, यासाठी आम्ही हा उपक्रम आयोजित केला. त्यांच्या मनात इस्लाम धर्माविषयी काही प्रश्न असतील तर त्यांनी आम्हाला विचारावे, आम्ही त्यांच्या मनातील शंका दूर करू. जेणेकरून इस्लाम धर्माचा नेमका अर्थ त्यांना माहीत होईल, असेही त्यांनी सांगितले.

मशिदीमध्ये महिलांना प्रवेश करताना यापूर्वी कधी पाहिले नव्हते, परंतु तेथे मात्र ही गोष्ट अपवाद होती. मुस्लीम धर्माव्यतिरिक्त इतर धर्माच्या महिलाही या मशिदीमध्ये आल्या होत्या आणि आतील भागाची माहिती करुन घेत होत्या. याविषयी आम्ही शेख करीमुद्दीन यांना विचारले असता त्यांनी सांगितले, इस्लाम धर्मात महिलांना मशिदीमध्ये प्रवेश नाही असे कुठेही लिहिलेले नाही. त्यासुद्धा आतमध्ये येऊ शकतात. पुरुषांना मशिदीमध्ये येऊन नमाज पढणे जसे बंधनकरक आहे, तसे महिलांना नाही. मशिदीमध्ये महिलांसाठी स्वतंत्र जागा असते आणि त्या तिथे उभ्या राहू शकतात. हिजाब घालून त्या येऊ शकतात.

First Published on: December 18, 2018 4:20 AM
Exit mobile version