खंडणीसाठी बांधकाम मजुराची हत्या

खंडणीसाठी बांधकाम मजुराची हत्या

गावात बांधकाम करणार असाल तर पैसे द्यावे लागतील, असे सांगत मजुराच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार करून खून झाल्याची घटना नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील रांजणी येथे घडली. यासंदर्भात मंगळवारी (दि.३) रात्री पाथर्डी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

साहिल उर्फ सोन्या मुबारक पठाण, असे हत्या झालेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. तो नगर तालुक्यातील खोसपुरी येथील रहिवासी आहे. तर, त्याचा दुसरा सहकारी नातेवाईक इरफान हसन पठाण याचादेखील खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो जखमी झाला आहे. रांजणी येथे नवनाथ मारुती घोडके यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. घोडके यांच्या घराचे बांधकाम इरफान पठाण, त्याचा चुलत भाऊ, आणि चुलता असे तिघेजण करत होते.

गावातील टोळक्याने त्यांच्याकडे येत येथे बांधकाम करणार असाल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील, असे सांगत त्यांच्याकडे पैशाची मागणी केली होती. यावेळी आरोपींनी साहिल पठाण याच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार करत हत्या केली; तर इरफान पठाण यालादेखील जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पाथर्डी पोलीस ठाण्यात यासंदर्भात बुट्ट्या पवार, साहेबराव तुकाराम पवार (दोघे रा. रांझणी ता. पाथर्डी) यांच्यासह आणखी दोन अनोळखी व्यक्तींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

First Published on: December 5, 2019 6:41 AM
Exit mobile version