उल्हासनगरातील नाभिक समाज काळ्या फितीसह पालिकेवर धडकला

उल्हासनगरातील नाभिक समाज काळ्या फितीसह पालिकेवर धडकला

लॉकडाऊनपासून दुकाने बंद असल्याने उपासमारीचे संकट ओढावलेल्या नाभिक समाजाने आज उल्हासनगर महानगरपालिकेवर धडक दिली आहे. सलूनची दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी किंवा प्रत्येक दुकानदाराला प्रत्येकी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी आयुक्त समीर उन्हाळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जवळपास सर्वच दुकाने सुरू झाली असून रोडवर, बाजारपेठेत ग्राहकांची रेलचेल सुरू झालेली आहे. त्यात चार भिंतींच्या आत व्यवसाय करणारा नाभिक समाजच वंचित ठेवण्यात आलेला आहे. सलूनच हा एकमेव कमाईचा मार्ग असून तोच गेल्या तीन महिन्यापासून ठप्प पडल्याने समाजातील परिवाराची आर्थिक स्थिती डबघाईची झाली आहे. त्यामुळे संसाराचा गाडा हाकण्यासाठी सलून सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी. अटी शर्तीनुसार आम्ही व्यवसाय करू अशी ग्वाही शिष्टमंडळाने समीर उन्हाळे यांना दिली. किंवा दहा हजार रुपये आर्थिक मदत करावी अशी विनंती केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष अरुण जाधव, शहराध्यक्ष भारत राऊत, ठाणे जिल्हाध्यक्ष सुशील पवार, सुनंदा आमोदकर, प्रतिभा कालेकर आदी उपस्थित होते.

मागच्या महिन्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पूर्वेतील नाभिक समाजाला धान्याचे किट्स दिले होते. हा आधार ठरला होता. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील नाभिक समाजाला पुन्हा पायावर उभे राहण्यासाठी सलूनची दुकाने सुरू करण्याची अटी शर्तीनुसार परवानगी द्यावी, हीच आमची मागणी असल्याचे सुशील पवार यांनी सांगितले.

First Published on: June 9, 2020 8:44 PM
Exit mobile version