स्वाईन-फ्लूची रुग्णसंख्या शंभरीपार

स्वाईन-फ्लूची रुग्णसंख्या शंभरीपार

नाशिक : शहरात स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून येत आहे. आरोग्याच्या बाबतीत शहरातील परिस्थिती गंभीर बनल्याचे चित्र असून, कोरोनापाठोपाठ स्वाईन फ्ल्यूचीही रुग्णसंख्या चिंताजनक ठरत आहे. ऑगस्टच्या पहिल्या तीन आठवड्यांत १०६ रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये दाखल असल्याची आकडेवारी असून, खासगी रुग्णालयांमध्ये देखील ४९ रुग्ण असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली आहे.

एकीकडे कोरोना संकट अद्याप पूर्णत: ओसरले नसताना साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याने नाशिकच्या आरोग्य व्यवस्थेची चिंता चांगलीच वाढली आहे. कोरोना पाठोपाठ आता स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. स्वाइन फ्ल्यूमुळे आतापर्यंत शहरातील तीन जाणांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्हाभरातील एकूण ११ जणांचा बळी गेल्याची नोंद आहे. जून महिन्यापासून शहरात स्वाइन फ्ल्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. जून महिन्यात २ तर जुलै महिन्यात २८ रुग्ण आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

यानंतर २५ ऑगस्टपर्यंत स्वाइन फ्ल्यूच्या एकूण रुग्णांची संख्या थेट १०६ वर पोहोचल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. स्वाइन फ्ल्यूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच असल्याने त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून खासगी रुग्णालयांनाही स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांना दाखल केल्यास वा उपचार केल्यास दैनंदिन माहिती सादर करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भात वैद्यकीय विभागाने शहरातील सर्व खासगी रुगणालयांना पत्र लिहून कळवल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.

साथीच्या आजारांनी डोके वर काढले असताना नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे बनले आहे. महत्वाचे काम असेल, तरच गर्दीज्या ठिकाणी जावे अन्यथा टाळावे. नियमित मास्क वापरावा. खासकरून लहान मुलांची खबरदारी घ्यावी. लक्षणे वाटल्यास तातडीने जवळील रुग्णालयांत जाऊन वैद्यकीय उपचार व सल्ला घ्यावा. महापालिका प्रशासनाकडून खासगी रुग्णालयांना सूचना करण्यात आल्या असून, दैनंदिन माहिती मागवली जात आहे. त्यानुसार योग्य त्या उपाययोजनाही केल्या जात आहेत. : डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, आरोग्य विभाग, नाशिक महापालिका

 

First Published on: August 25, 2022 2:42 PM
Exit mobile version