मांडव्याजवळ प्रवासी बोट बुडाली

मांडव्याजवळ प्रवासी बोट बुडाली

गेट वे ऑफ इंडिया (मुंबई) ते मांडवा (अलिबाग) या दरम्यान प्रवासी वाहतूक करणार्‍या अजंठा कंपनीची प्रवासी बोट मांडाव्याजवळ समुद्रात बुडाली. मात्र पोलिसांसह खलाशांच्या तत्परतेमुळे या बोटीतून प्रवास करणार्‍या 88 प्रवाशांचे प्राण वाचले. वेळेत मदत मिळाली नसती तर या मार्गावर रासदास बोट बुडाल्यानंतरची ही मोठी दुर्घटना ठरली असती. शनिवारी सकाळी 9.30 नंतर ही बोट गेट वे ऑफ इंडिया येथून मांडव्याकडे येण्यास निघाली. मांडवा जेट्टीपासून 1 किलोमीटर अंतरावर असताना सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास बोटीत अचानक बिघाड होऊन ती बुडू लागली. त्यामुळे बोटीतून प्रवास करणार्‍या प्रवाशांत एकच हलकल्लोळ उडाला. पुरुष, महिला आणि लहान मुले घाबरून जीवाच्या आकांताने आरडओरडा करू लागली. समोर मृत्यू दिसू लागल्यामुळे सर्वांनी देवाचा धावा सुरू केला. बोट बुडत असल्याची माहिती बोटीवरील तांडेलने पोलिसांना आणि इतर बोटींना दिली.

ही माहिती मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक धर्मराज सोनके यांना मिळताच त्यांनी सागरी गस्तीवर निघालेल्या रायगड जिल्हा पोलीस दलातील ‘सद्गुरु कृपा’ बोटीवरील नेमणुकीस असलेले पोलीस कर्मचारी प्रशांत घरत यांना दिली. घरत यांनी तत्परतेने बुडणारी बोट गाठली. या सर्वांच्या मदतीने प्रवाशांना दुसर्‍या बोटीत बसवून सुखरूपपणे मांडवा येथे आणण्यात आले. मदत मिळण्यास उशीर झाला असता तर 88 जणांना जलसमाधी मिळाली असती. पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. खलाशी आणि पोलीस संकटात सापडलेल्या प्रवाशांसाठी अक्षरशः देवदूत ठरले.

मांडवा जेट्टीवर पोहोचताच या प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला आणि मोठ्या आपत्तीतून वाचल्याने त्यांनी देवाप्रमाणे पोलीस आणि खलाशांचे आभार मानले, तेव्हा त्यांच्यापैकी अनेकांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. उपनिरीक्षक सोनके आणि सहकार्‍यांनी सर्व प्रवाशांना मदत केली. बुडणारी बोट बाहेर काढण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. अजंठा या बोटसेवा देणार्‍या कंपनीवर पोलीस कारवाई करण्यात येणार असल्याचे सोनके यांनी सांगितले. दरम्यान, या बोटीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेण्यात आल्याचे बोलले जाते. प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

सुमारे 400 बोटींची नोंदणी मुंबई बंदरात झाली आहे. या बोटींचे सर्वेक्षण पूर्वी मर्कंटाइल मरिन डिपार्टमेंटकडे होते. परंतु ते आता मेरीटाइम बोर्डाकडे सोपविण्यात आले आहे. बोटींचे सर्वेक्षण योग्य होत नाही. अजंठा कंपनी प्रवाशांच्या जीवाशी खेळ करते आहे. बोटींच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक केली जात असल्यामुळे असे प्रसंग उद्भवतात. यावर योग्य ती कारवाई व्हायला हवी.
– चंद्रकांत मोकल, अध्यक्ष, ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशन

रायगड पोलिसांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
मांडवा समुद्रात बुडणार्‍या बोटीतील महिला आणि बालकांसह 88 जणांना वाचविणार्‍या रायगड पोलिसांच्या सागरी सुरक्षा दलातील जवानांच्या धाडसाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले आहे. पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टाळण्यात यश आले आहे. जीवाची पर्वा न करता राबविण्यात आलेले बचाव कार्य आणि त्यासाठीच्या प्रसंगावधानासाठी मुख्यमंत्र्यांनी सागरी सुरक्षा दलाच्या कार्यक्षमतेला दाद दिली आहे. पोलीस नाईक प्रशांत घरत (बक्कल क्रमांक 891) यांनी ट्रॉलर वरील तांडेल आणि खलाशांची मदत घेऊन बुडणार्‍या प्रवाशांना वाचवले.

First Published on: March 15, 2020 6:49 AM
Exit mobile version