ड्युटी लावल्याच्या रागातून पोलीस उपनिरीक्षकाचा हजेरी मास्टरवर हल्ला

ड्युटी लावल्याच्या रागातून पोलीस उपनिरीक्षकाचा हजेरी मास्टरवर हल्ला

Police

ड्युटी लावल्याचा राग आल्यामुळे पोलीस उपनिरीक्षकाने हजेरी मास्टरवर पिस्टलच्या बटने हल्ला केला. यात हजेरी मास्टर जखमी झाले . त्यांच्यावर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत 19 फेब्रुवारी रोजी रात्री ही घटना घडली. या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी केली जाईल, असे जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी स्पष्ट केले.

जिल्हा मुख्यालयात असणार्‍या राखीव पोलिसांची ड्युटी पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार लावली जाते. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार राखीव पोलीस दलाच्या पोलीस निरीक्षकांनी 20 फेब्रुवारी साठी राखीव पोलीसांची ड्युटी लावली होती. पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या हजेरी यादीनुसार हजेरी मास्टर मंगेश निगडे यांनी पोलीस उपनिरीक्षक अश्विन जाधव यांना ड्युटी लावली असल्याचे कळविले.

जाधव यांना ड्युटीची कल्पना दिल्यानंतर हजेरी मास्टर मंगेश निगडे 19 फेब्रुवारी रोजी ड्युटी लावलेल्या पोलिसांना सोडायचे का? हे विचारण्यासाठी रात्री 8 वाजता जिल्हा डीएसीबी शाखेकडे जाण्यास निघाले होते. हिराकोट तलावाजवळ निगडे व त्याचा साथीदार आले असता, पोलीस उपनिरीक्षक अश्विन जाधव यांनी त्यांना अडवून ड्युटी लावण्याबाबत विचारणा केली.

जाधव यांनी निगडे यांच्याडोक्यात पिस्टलच्या बटने हल्ला करून जखमी केले. निगडे रक्तबंबाळ अवस्थेत कसेबसे तेथून स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांना जाऊन भेटले व झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगेश निगडे यांनी आपल्यावर झालेल्या हल्याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात जबाब लिहून दिला आहे. मात्र अद्यापही याबाबत कोणताही गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला नाही.

First Published on: February 21, 2019 4:46 AM
Exit mobile version