आंगणेवाडीतल्या लघु पाटबंधारांचा प्रश्न लागला मार्गी

आंगणेवाडीतल्या लघु पाटबंधारांचा प्रश्न लागला मार्गी

लघु पाटबंधारे

कोकणातील बहुचर्चित आंगणेवाडी येथील मसुरे लघु पाटबंधारे प्रकल्पास अखेर मान्यता मिळाली आहे. त्यामुळे येथील सिचंनाचा प्रश्न लवकरच निकाली निघणार आहे. ठाकरे सरकारने या प्रकल्पाच्या निधीला मान्यता देण्याचा महत्वपूर्ण निर्णयास शुक्रवारी मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे कोकणवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे येथील नाल्यावर प्रस्तावित असलेल्या लघु पाटबंधारे योजना मसुरे या प्रकल्पास २२ कोटी ११ लक्ष ८८ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली आहे. याबद्दल बोलताना गडाख म्हणाले, ‘मसुरे भागात उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई भासत होती. मात्र आता या योजनेमुळे परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा हा प्रकल्प मार्गी लागणार असून यामुळे सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या या प्रकल्पाचा शासन निर्णय निर्गमित केलेला असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. या बाबतीत कार्यादेश देण्यात येणार असून, लवकरच याला प्रत्यक्ष सुरूवात केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले’.

मालवण तालुक्यातील मसुरे आंगणवाडी या योजनेची एकूण साठवण क्षमता ९८५ सघमी इतकी आहे. या प्रकल्पांतर्गत ८० हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. पाणलोट क्षेत्र १.२४ चौरस किलोमीटर आहे. पन्नास टक्के विश्वासार्ह पर्जन्यमान ११९.१०  तर पन्नास टक्के विश्वासार्ह पाण्याची आवक २८१०.२१ सघमी इतकी असणार आहे. या मातीच्या धरणाची लांबी २६६ मीटर व उंची २६.६१ मीटर असणार आहे, अशी माहिती गडाख यांनी यावेळी दिली.

First Published on: February 14, 2020 8:08 PM
Exit mobile version