नववी आणि अकरावीचा निकाल अद्यापही गुलदस्त्यात

नववी आणि अकरावीचा निकाल अद्यापही गुलदस्त्यात

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे नववी आणि अकरावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला असला तरी विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल कशा पद्धतीने तयार करायचा याबाबत सरकारने कोणत्याही सूचना दिल्या नाहीत. त्यामुळे निकाल कशा पद्धतीने तयार करायचा यासंदर्भात शिक्षकांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने तातडीने परिपत्रक जारी करण्याचे आवश्यक असल्याचे मत शिक्षक आणि शाळांतून व्यक्त होत आहे.

इयत्ता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरासरी गुणदान करून निकाल जाहीर करायचा आहे. मात्र त्यासाठी पद्धत काय आणि निकाल कसा तयार करायचा असा पेच शाळांपुढे निर्माण झाला आहे. शालेय शिक्षण विभागाने एक परिपत्रक काढून निकाल काढण्यासंदर्भातील सूचना दिल्या जातील असे म्हटले आहे. मात्र ते कधी काढणार असा सवाल शाळांकडून होत आहे. नाशिक येथील शिक्षण उपसंचालकांनी यासंदर्भातील सूचना शाळांना दिल्या आहेत. मात्र अद्याप मुंबईत काहीच कार्यवाही सुरु नाही अशीही तक्रार शिक्षकांनी केली आहे. अकरावीच्या संदर्भातही सूचना कनिष्ठ महाविद्यालयीन संघटना करीत सर्व विद्यार्थ्यांना सरसकट बारावीला प्रवेश द्या, अशी मागणी होत आहे. यासंदर्भात राज्य स्तरावर तातडीने शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक काढावे असा सूर आता शाळा महाविद्यालयांकडून होत आहे.

राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खासगी अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि स्वयंअर्थसाहाय्यित शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे आकारिक, संकलित मूल्यमापनाद्वारे भारांशाप्रमाणे होते. २० ऑगस्ट २०१० रोजीच्या शासन आदेशानुसार सन २०१०-११ या शैक्षणिक वर्षापासून या पद्धतीने मूल्यमापनाची कार्यवाही दरवर्षी केली जाते. त्यामुळे या वर्गाचा निकाल काढणे सोपे आहे. यासंदर्भातही अद्याप थेट परिपत्रक नसल्याने गोंधळ आहे.

First Published on: April 22, 2020 8:09 PM
Exit mobile version