एसटी कर्मचाऱ्यांचा थकीत पगार तातडीने द्यावा – प्रविण दरेकर

एसटी कर्मचाऱ्यांचा थकीत पगार तातडीने द्यावा – प्रविण दरेकर

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन दिलं. यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगार तात्काळ द्यावा, असं प्रविण दरेकर यांनी सांगितलं. कोरोनामुळे मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना जाहीर केल्याप्रमाणे ५० लाख रुपये विम्याची रक्कम तातडीने अदा करावी या मागणीसह कोरोना महामारीच्या काळात कोणत्याही सेवकांचे वेतन कापू नये, त्यांना वेतन वेळेत अदा करावं, असं निवेदन देखील दरेकर यांनी परिवहन मंत्र्यांना दिलं.

एवढी वर्ष कर्मचाऱ्यांनी केलेली सेवा लक्षात न घेता केवळ नफा-तोटा लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांना पगारापासून वंचित केलं जात आहे. त्यामुळेच कर्मचाऱ्यांवर आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून त्यांना मजुरी, भाजीपाला विकणे अशी कामे करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत असल्याचं दरेकर यांनी अनिल परब यांना सांगितलं. एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराचा प्रश्न तसंच लॉकडाऊनच्या काळातील ३० टक्के कर्मचाऱ्यांचा नाकारलेला पगार तातडीने अदा करावा, त्याचप्रमाणे बेकायदेशीरपणे लावलेली २० दिवसांची सक्तीची रजा मागे घ्यावी, असं या निवेदनात म्हटलं आहे.

परिवहन मंत्र्यांनी घोषित केल्याप्रमाणे संबंधित कर्मचाऱ्यांना प्रति दिवस ३०० रुपये याप्रमाणातील भत्ता आठवड्याच्या आत द्यावा अशी मागणी प्रविण दरेकर यांनी आज परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे केली आहे. परिवहन मंत्री परब यांनी या मागण्या मान्य केल्या असून लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करुन निधीच्या उपलब्धतेनुसार लवकरच एसटी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात येतील, असं सांगितलं.

 

First Published on: September 21, 2020 10:31 PM
Exit mobile version