शिघ्रे नदी झालीय डम्पिंग ग्राऊंड!

शिघ्रे नदी झालीय डम्पिंग ग्राऊंड!

तालुक्यातील शिघ्रे ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक नदीला सध्या डम्पिंग ग्राऊंडचे स्वरुप आले आहे. अनेकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.या नदीत गणपती, देवींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येत असल्याने या नदीचे पावित्र्य जपण्याऐवजी तेथे परिसरातील काही नागरिक कचरा, कोंबड्यांची पिसे आणून टाकतात. स्वाभाविक अवती-भवती दुर्गंधीचेही साम्राज्य पसरले आहे. नदीवरील पुलावरून जाणार्‍या-येणार्‍यांना नाक मुठीत धरून जा-ये करावी लागत आहे. सध्या नदीच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात तवंग तयार होत आहे. नदीच्या पात्रात आजमितीला मातीचे ढिगारे, गाळाची डबकी, झाडेझुडपे दिसत आहेत. नदीची नैसर्गिक प्रवाहाची लय बिघडल्याने तिचे स्वरुप डबक्यासारखे झाले आहे. नदीची ही वाताहात थांबवून तिला गतवैभव प्राप्त करून देण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

या संदर्भात सरपंच संतोष पाटील यांना विचारले असता त्यांनी नदीला आलेले बकाल स्वरुप आणि झालेली दुरवस्था मान्य केली. कोंबड्यांची पिसे टाकणार्‍या कोंबडी विक्रेत्यांना वारंवार नोटिसा देऊनही ते त्याला जुमानत नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायतीने तहसीलदारांना कारवाईसाठी विनंती केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कचरा आणि अन्य वस्तू टाकण्यास अटकाव करण्यासाठी लवकरच सूचना फलक लावण्यात येणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.

First Published on: November 20, 2019 2:00 AM
Exit mobile version