राज्य सरकार राज्यातील ५० टक्के कैद्यांना सोडणार 

राज्य सरकार राज्यातील ५० टक्के कैद्यांना सोडणार 

राज्यात सध्या कोरोनाचे संकट असून, दिवसेंदिवस हे संकट अधिकच गडद होत आहे. त्यातच आता कोरोनाचे कारागृहात देखील शिरकाव केला असून, आता राज्यातील ५० टक्के  कैद्यांना राज्य सरकारने सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जेलमधील कैद्यांना कोरोनाची लागण होत असल्याने पॅनेलने हा निर्णय घेतला आहे. या पॅनलमध्ये न्यायमूर्ती ए. ए. सय्यद, राज्याच्या तुरुंग विभागाचे पोलीस महासंचालक एस. एन. पांडे तसेच अतिरिक्त मुख्य सचिव संजय चहांदे यांचा समावेश आहे. दरम्यान आर्थर रोड कारागृहातील ७७ कैद्यांच्या उपचारासाठी जागेबाबत तडजोड सुरु असताना, कारागृहातील आणखीन ८१ कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले होते. त्यामुळे कोरोनाबाधित कैद्यांचा आकडा १५८ वर पोहचल्याने राज्य सरकारच्या चिंतेत भर पडली होती. याचमुळे राज्य सरकारने या तुरुंगातील कैद्यांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. भायखळा कारागृहातील ५४ वर्षीय महिला कैदीला कोरोनाची लागण झाल्याचेही समोर आले होते. विशेष म्हणजे राज्य सरकारने करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच काही कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय देखील घेतला होता.

या तुरुंगातील कैद्यांची होणार सुटका –

आर्थर रोड, तळोजा, येरवडा, नाशिक, कोल्हापूर औरंगाबाद येथील कारागृहातील ज्या कैद्यांची शिक्षा सात वर्षे पेक्षा कमी आहे त्या कैद्यांची तात्पुरती सुटका करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे राज्यातील अनेक कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी असून, करोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे सरकारने राज्यातील काही तुरूंगामध्ये लॉकडाऊन करण्याचाही निर्णय घेतला होता. सर्वात आधी औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहात लॉकडाऊनची अमलबजावणी करण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात कारागृहांचे दरवाजे बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच या कारागृहातील कर्मचाऱ्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था आतमध्येच निर्देश दिले आहेत.

First Published on: May 12, 2020 7:44 PM
Exit mobile version