नगरच्या जिल्हा रूग्णालयातून पळालेले संशयित करोना रूग्ण उपचारासाठी रूग्णालयात परतले – डॉ. प्रदीप मुरंबीकर

नगरच्या जिल्हा रूग्णालयातून पळालेले संशयित करोना रूग्ण उपचारासाठी रूग्णालयात परतले – डॉ. प्रदीप मुरंबीकर

करोना व्हायरस

अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातून पळालेले तीनही संशयित करोना रुग्ण पुन्हा उपचारासाठी रुग्णालयात परतल्याची माहीती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली. तसेच समाज माध्यमांमध्ये रुग्णाची नावे कोणीही जाहीर करु नये, असे आवाहनदेखील करण्यात आले आहे.

दुबईला गेलेल्या चारपैकी एकाला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्या रुग्णाला बुथ हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी हलविले होते. तर या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ८ आणि आणखी ८ अशा १६ जणांच्या रक्त व थुंकीचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तर करोना संशयित म्हणून १९ लोकांना जिल्हा रुग्णालयात निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. मात्र यापैकी दोन महिला आणि एक पुरुष रुग्ण शनिवारी दुपारी रुग्णालयातून उपचारादरम्यान पसार झाले होते. हे संशयित रुग्ण कोणाच्या संपर्कात आल्यास आणखी वेगळे परिणाम दिसू शकतात, यामुळे घबराट निर्माण झाली होती.

रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या आयसोलोशन वार्डमधून पळालेल्या या तीन जणांना शोधून आणण्यासाठी तोफखाना पोलिसांना रुग्णालयाच्या प्रशासनाच्यावतीने पत्र देण्यात आले होते. दरम्यान रात्री उशिराने हे तीनही रुग्ण उपचारासाठी पुन्हा रुग्णालयात परतल्याची माहिती रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली. संशयित करोना बाधित पुन्हा उपचारासाठी रुग्णालयात परतल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला.

First Published on: March 15, 2020 4:10 PM
Exit mobile version