मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तिसरी लेन खुली होणार

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तिसरी लेन खुली होणार

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अमृतांजन ब्रिज तोडण्याचे काम पुर्ण झाल्यानंतर आता गेल्या चार दिवसांमध्ये संपुर्ण मलबा हटवण्यात यश आले आहे. एकूण १२०० ट्रकचा वापर करता याठिकाणचा मलबा काढण्यात आला आहे. त्यामुळे आता हा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. येत्या १४ एप्रिलपर्यंत हा मार्ग मोकळा करून देण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ठेवले आहे. लॉकडाऊन संपण्याच्या आधीच हा रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी सध्या एमएसआरडीसीची टीम अहोरात्र काम करत आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर १९० वर्षांच्या अमृतांजन ब्रिजला २०० स्फोटकांचा वापर करून जमीनदोस्त करण्यात आले. त्यावेळी मोठ्या प्रमाणात मलबा या रस्त्यावर पडला होता. मुंबई आणि पुणे अशा दोन्ही दिशेची वाहतुक यामुळे ठप्प झाली होती. आता १२०० ट्रकचा वापर करून हा मलबा हटवण्यात आला आहे. शुक्रवारी उशिरापर्यंत हा मलबा उचलण्याचे काम सुरू होते. त्यामुळे आता हा संपुर्ण मार्ग मोकळा करण्यात आला आहे. आता अमृतांजन ब्रिजच्या पिलरच्या बाजुचा भाग ब्लास्टिंगने हटवण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे मोकळा झालेला मार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. या कामासाठी अनेक दिवसांपासून ब्लॉकची परवानगी मिळाली होती. पण मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतुक सातत्याने सुरू असल्याने या ब्रिजला हटवण्याचे काम करता येत नव्हते. त्यामुळेच आता लॉकडाऊनच्या कालावधीत हे काम पुर्ण करणे शक्य झाले.

तिसऱ्या लेनचे काम होणार

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अमृतांजन ब्रिजच्या ठिकाणी सध्या दोन लेनच्या माध्यमातूनच मुंबई आणि पुण्याच्या दिशेने वाहतुक होते. पण आता अमृतांजन ब्रिज जमीनदोस्त केल्याने याठिकाणी अतिरिक्त अशी तिसऱ्या लेनची जागा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे याठिकाणी आता कॉंक्रिटीकरणाचे काम करून तिसऱ्या लेनसाठी जागा उपलब्ध होईल. येत्या पंधरा दिवसात ही तिसरी लेन वाहन चालकांसाठी उपलब्ध होईल, अशी माहिती एमएसआरडीसीचे सह व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांनी दिली. लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर काही दिवसात ही लेन उपलब्ध होईल. त्यामुळे एक्स्प्रेस वेवर याठिकाणी होणारी वाहतुककोंडी कमी होण्यासाठी या तिसऱ्या लेनची मदत होईल.

First Published on: April 11, 2020 7:51 PM
Exit mobile version