आचरे गावची गावपळण! परंपरेनुसार गावकरी गाव सोडून जाणार

आचरे गावची गावपळण! परंपरेनुसार गावकरी गाव सोडून जाणार

देव दिवाळीला रामेश्वराच्या कौल प्रसादाने बहुचर्चित आणि सर्वांना प्रतिक्षा असलेली आचरा गावची गावपळण बुधवारी दुपारी ठरली. या गावपळणीची सुरूवात दत्त जयंतीच्या दुसर्‍या दिवशी १२ डिसेंबरला होणार आहे. दर चार ते पाच वर्षांनी गावपळणीचे साल आल्यावर देव दिवाळीला बारा-पाच मानकरी रामेश्वर मंदिरात जमून रामेश्वरला गावपळणीचा कौल प्रसाद घेतला जातो. बुधवारी देवदिवाळीला सर्व मानकरी कमेटीदार रामेश्वर मंदिरात जमून गावपळणीचा रामेश्वराकडून कौल प्रसाद घेतला.

रामेश्वराचा हुकूम झाल्याने आता पूर्वांपार चालत आलेल्या परंपरेनुसार दत्त जयंतीच्या दुसर्‍या दिवशी गावपळणीला सुरूवात होणार आहे. गावपळणी दिवशी दुपारी तोफांच्या आणि नौबतीच्या इशारतीवर ग्रामस्थ गुरे ढोरांसह कोंबड्या कुत्रे घेऊन गावाच्या वेशीबाहेर नियोजित स्थळी राहुट्या, झोपड्या उभारुन राहतात. तीन दिवस तीन रात्रीनंतर चौथ्या दिवशी गावभरण्याचा पुन्हा रामेश्वराला कौल घेऊन गाव भरला जातो. आचरा गावची ही अनोखी प्रथा अनुभवण्यासाठी चाकरमान्यांनसह अनेक जण या गावपळणीत सहभागी होत वेशीबाहेर आनंदाने निसर्गाच्या सान्निध्यात राहतात.

गावपळण म्हणजे काय?

एक अनोखी प्रथा इथे पाळली जाते आणि ती म्हणजे दर तीन वर्षांनी येणारी गावपळण ही होय. काय असतो हा प्रकार आणि नक्की त्या वेळी काय केले जाते हे जाणून घेणे मोठे रंजक आहे. रामेश्वराला कौल लावून दिवस ठरवले जातात आणि ते तीन दिवस सर्वच्या सर्व गावकरी आपले चंबूगबाळे घेऊन गावातून बाहेर पडतात. सारा गाव हा रामेश्वरासाठी मोकळा करून दिला जातो. काही मंडळी आजूबाजूच्या गावांत असलेल्या नातेवाईकांकडे जातात, तर बाकीची मंडळी गावाच्या बाहेर रानात तात्पुरत्या झोपड्या बांधून तिथे जाऊन राहतात.

तीन दिवस गावात कोणीही जात नाही. गावातील सर्व व्यवहार बंद असतात. आता गावात बँका, सरकारी कार्यालये आहेत, परंतु तिथेही शुकशुकाट असतो. गावात फक्त सुरक्षेसाठी पोलीस दिसतात, परंतु या गावात या तीन दिवसांत चोरी होत नाही. गावपळण ही प्रथा अंदाजे तीनशे- साडेतीनशे वर्षे जुनी असल्याचे गावकरी सांगतात.

अशी आख्यायिका सांगितली जाते की, कधी काळी म्हणे भुतांनी या गावात उच्छाद मांडला होता. तेव्हा दलोक देव रामेश्वराला शरण गेले. देव म्हणाला की, मला गाव तीन दिवस मोकळा करून द्या, मी त्या सर्व भुतांना वठणीवर आणतो आणि तेव्हापासून दर तीन वर्षांनी सगळा गाव देवासाठी मोकळा करून दिला जातो. पण सध्याच्या तरुण पिढीला हा युक्तीवाद पटत नाही. तरीसुद्धा ते मोठ्या हिरिरीने या उपक्रमात सहभागी झालेले असतात. तीन दिवस गाव मोकळा राहिल्यामुळे प्रदूषण, रोगराई अशा काही गोष्टी गावात असतील तर त्यांचा नायनाट होतो. लोक मोकळ्यावर जाऊन राहतात, तिथे त्यांना वेगळे शेजारी लाभतात, त्यातून एकी निर्माण होते, असेही मानले जाते.

First Published on: November 28, 2019 10:45 PM
Exit mobile version