परतीच्या पावसामुळे गावे अंधारात !

परतीच्या पावसामुळे गावे अंधारात !

मेघगर्जनेसह बरसलेल्या परतीच्या पावसाने जाता जाता महावितरणच्या मर्यादा पुन्हा एकदा स्पष्ट केल्या आहेत. मुरुड तालुक्यातील बोर्ली आणि पंचक्रोशीतील गावे तब्बल २0 तासांहून अधिक वेळ अंधारात राहिल्याने नागरिकांचे कमालीचे हाल झाले. पावसाने वीज वितरणच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. या पावसामुळे तब्बल पंचवीस तासाहून अधिक काळ विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याने नागरिकांचे पुरते हाल झाले.

मंगळवारी भारनियमन असल्यामुळे सकाळी 9 वाजता वीज पुरवठा खंडित होऊन दुपारी 4 वाजता पूर्ववत झाला. मात्र 5 च्या सुमारास मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची सुरूवात झाली आणि नेहमीप्रमाणे वीज पुरवठा खंडित झाला. बुधवारी दुपारी 1 वाजता वीज पुरवठा सुरळीत झाला. मात्र त्या दरम्यान नागरिकांना अंधारात काढावी लागली. बोर्ली भागात झीरो लोड शेडिंगचा दावा करूनही महावितरण अखंड वीज पुरवठा करण्यात अपयशी ठरल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. विजेचा खेळखंडोबा सुरू असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, तसेच रुग्णांचे हाल वाढत आहेत. तांत्रिक दोषामुळे वीज पुरवठा खंडित होत असल्याचे पालुपद महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी लावत असल्याने जनतेच्या संतापाचा कडेलोट होण्याची वेळी आली आहे.

ऐन सणासुदीच्या दिवसात गावांना अंधारात ठेवणार्‍या महावितरणच्या कारभारावर सर्वसामान्य जनता चिडलेली असताना लोकप्रतिनिधी मात्र काहीही बोलण्यास तयार नसल्याने सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जंपर जाणे, ट्रान्सफॉर्मर बिघाड, तारा तुटणे आदी प्रकार नित्याचेच झाले असले तरी महावितरणकडून त्याबाबत कोणतीच प्रभावी उपाययोजना केली जात नाही. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने छोट्या-मोठ्या व्यवसायांवरही संक्रांत आली आहे. वीज नसली की अनेकदा इंटरनेट सेवेवरही परिणाम होत असून, त्याचा फटका बँका, पोस्ट ऑफिस, सरकारी कार्यालये, तसेच ग्राहकांना बसत आहे.

गेल्या चार दिवसांत बोर्ली आणि परिसरात 40 तासांहून अधिक काळ वीज पुरवठा खंडित राहिला आहे. वीज कायदा 2009 सेक्शन 57 तथा भरपाईचे निश्चितीकरण कायद्यानुसार ठराविक तासात वीज पुरवठा पूर्ववत सुरू होणे आवश्यक आहे. वीज कंपनीने प्रति ग्राहक प्रति तास 50 रुपये याप्रमाणे भरपाई देण्याची मागणी वीज ग्राहकांनी केली आहे. म्हणजेच प्रत्येक ग्राहकास 2 हजार ते 2 हजार 500 रुपये भरपाई मिळावी, अशी मागणी त्रस्त झालेल्या नागरिकांनी केली आहे.

First Published on: October 10, 2019 1:08 AM
Exit mobile version