विधानपरिषद बिनविरोध होत असेल तरच उद्धव ठाकरे निवडणूक लढवणार – संजय राऊत

विधानपरिषद बिनविरोध होत असेल तरच उद्धव ठाकरे निवडणूक लढवणार – संजय राऊत

मुख्यमंत्र्यांच्या सभेतून राज्यातील गढूळपणा दूर होईल, संजय राऊतांचा विरोधकांवर निशाणा

काँग्रेसने दुसरा उमेदवार जाहीर केल्यामुळे विधान परिषदेच्या रिक्त जागासाठी आता निवडणूक होणार आहे. मात्र राज्यावर सध्या कोरोनाचे संकट असून, या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इच्छा असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच या संकटाच्या काळात अशाप्रकारे निवडणूक व्हावी हे योग्य नाही. उद्धव ठाकरे यांना अशाप्रकारच्या राजकारणात कधीही रस नव्हता आणि नाही. ते या सर्व प्रकारामुळे अस्वस्थ आहेत. ही निवडणूक बिनविरोध झाली तरच लढावी, अशी त्यांची इच्छा असल्याचे संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

या एका निवडणुकीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आमदार मुंबईला बोलवावे लागतील. त्यासाठी एक दिवस अधिवेशन घ्यावे लागेल, मग निवडणूक होईल. हे चित्र महाराष्ट्र आणि देशात चांगले जाणार नसल्याचे सांगत आम्हाला पूर्ण खात्री आहे की, ही निवडणूक बिनविरोधच होईल, असे राऊत म्हणाले आहेत. दरम्यान सध्या लोक पायी चालत घरी चालले आहेत. अनेक लोके घरामध्ये बंद आहेत. त्यांच्यासमोर रोजीरोटीचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे. अशावेळी महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष एकमताने एक निवडणूक घेऊ शकत नाही, हे महाराष्ट्राच्या परंपरेला कलंक लावणारे चित्र असेल, असेही राऊत म्हणाले आहेत.

“निवडणुका लढायला आम्ही घाबरत नाही. पण ही वेळ निवडणूका लढण्याची नाही. सध्याची वेळ कोरोनाची परिस्थिती हाताळण्याची आहे. आपण नाईलाज म्हणून ही निवडणूक घेत आहोत. राज्य अस्थिर होऊ नये म्हणून आम्ही स्वतः पंतप्रधानांशी चर्चा करुन ही निवडणूक घेत आहोत. याचे भान सगळ्यांनी ठेवले पाहिजे, असे संजय राऊत यांनी सांगितलं.

तसेच महाविकास आघाडीत विधान परिषदेच्या निवडणुकीवरुन कुणी किती जागा लढवायच्या? कसे पुढे जायचे यावर अजुनही चर्चा सुरू असल्याचे राऊत म्हणाले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडणूक रिंगणात असल्यामुळे चर्चेला थोडा वेगळा रंग येऊ शकतो. काँग्रेसकडे त्यांचा दुसरा उमेदवार निवडून आणण्याइतपत मतं नाही, त्यांचे ४४ आमदार आहेत असे आपण म्हणतो. मात्र, भाजपकडे देखील त्यांचा चौथा उमेदवार निवडून आणण्यासाठी आवश्यक मते नसल्याचे त्यांनी सांगितले.

First Published on: May 10, 2020 6:00 PM
Exit mobile version