महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण नाहीत -आरोग्यमंत्री टोपे

महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण नाहीत -आरोग्यमंत्री टोपे

करोना व्हायरस

चीनमध्ये उत्पत्ती झालेल्या करोना विषाणूमुळे जगभरात आतापर्यंत १३२ लोकांना जीव गमवावा लागला आहे. हा विषाणू आता भारताच्या वेशीवर आला आहे. महाराष्ट्र राज्यात आलेल्या प्रवाशांपैकी १० संशयित रुग्णांवर मुंबई, पुणे आणि नांदेड येथील हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. मुंबईतील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या तीन रुग्णांचे पहिले रिपोर्ट जरी निगेटिव्ह आले असले तरी दुसरा रिपोर्ट अजून येणे बाकी आहे. पण महाराष्ट्रात करोना विषाणूचे रुग्ण नाहीत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे.

राज्याच्या आरोग्य अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण १० नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी ६ नमुने नेगेटिव्ह असून ४ प्रवाशांचे नमुने प्रलंबित आहेत. तर, सहा नेगेटिव्ह प्रवाशांच्या नमुन्यांपैकी ३ प्रवाशांचे नमुने पुनर्तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत करोना विषाणूचे १० संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. “

दरम्यान, महाराष्ट्रात करोना व्हायरसबाधित एकही रुग्ण नाही अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आतापर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४ हजार ६०० प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे. राज्यात सध्या २७ प्रवासी निरीक्षणाखाली असून त्यातील १० प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यातील सहाजणांना मुंबई येथे, तीन जणांना पुण्यात तर एकाला नांदेडमध्ये दाखल करण्यात आले आहे.

या दहा जणांचे नमुने एनआयव्ही कडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी सहाजणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित चार जणांच्या नमुन्यांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. तीनजणांचे नमुने दुसर्‍यांदा तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांचाही अहवाल अद्याप अप्राप्त आहे. उर्वरित १७ प्रवाशांची दूरध्वनीद्वारे रोज विचारपूस केली जात असल्याचंही आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

First Published on: January 30, 2020 7:11 AM
Exit mobile version