गोव्यातील मौजमजेसाठी ‘त्यांनी’ रचला चोरीचा बनाव; १२ तासात गजाआड

गोव्यातील मौजमजेसाठी ‘त्यांनी’ रचला चोरीचा बनाव; १२ तासात गजाआड

गोव्यातील मौजमजेसाठी त्यांनी रचला चोरीचा बनाव

गुन्हेगारीवर आधारित मालिका पाहून चोरीचा बनाव रचणाऱ्या दोघांना १२ तासाच्या आत गुन्हे शाखा ५ने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून तब्बल ३४ लाख ३९ हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. कर्जाची परतफेड आणि गोव्यात मौजमजा करण्यासाठी ही उठाठेव केल्याचे पोलीस तपासत समोर आले आहे. कुणाल रवींद्र पवार (वय-२०) आणि मित्र ओंकार बाळासाहेब भोगाडे (वय-२१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान गुन्हेगारीवर आधारित मालिकेतून प्रेरणा घेऊन चोरीचा बनाव रचल्याची कबुली दोघांनीही पोलिसांना दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला देहूरोड परिसरात आरोपी कुणाल आणि ओंकार यांनी लुटण्याचा बनाव रचला. कुणाल हा लॉजीकॅश या कंपनीत कामाला असून तो पैसे जमा करण्याचे काम करत. १४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी दिवसभर भोसरी, दिघी, नाशिक फाटा, पिंपळे सौदागर, पिंपरी, देहूगाव आणि देहूरोड येथील काही व्यक्तींकडून पैसे जमा केले होते. दरम्यान, त्यांनी आठ दिवसांपूर्वीच गुन्हेगारीवर आधारित मालिका बघून पैसे लुटायचे असे या चोरांनी ठरवले होते.

हेही वाचा – अभिनेत्री दिपाली सय्यदच्या फाऊंडेशनकडून पूरग्रस्तांना ५ कोटींची मदत

अशी होती चोरीची योजना

या चोरीतील पैशांच्या आधारे कर्जफेड आणि गोव्यात जाऊन मौजमजा करण्याची योजना त्यांनी आखली होती. त्यानुसार योजनेप्रमाणे बुधवारी ६ वाजता दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने कुणाल चालवत असलेल्या गाडीला धक्का दिला. यावेळी पिस्तूलाचा धाक दाखवून कुणाल जवळील ३३ लाख ३० हजार रोख रक्कम या चोरांनी पळवून नेली, असे पोलिसांना सांगितले.

अशी पकडली चोरी

याप्रकरणाची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याच्या बोलण्यात विसंगती आढळली. मोबाईलची तपासणी केली असता पोलिसांना कुणालच्या मोबाईलमधील मॅसेज डिलीट करण्यात आल्याचे आढळले. अशाप्रकारे तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. अखेर मित्रासह लुटण्याचा बनाव रचल्याचे कुणालने कबूल केले. सदरची कामगिरी सहायक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक निलेश बोडखे याच्या पथकाने केली. तसेच देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी या प्रकरणी मदत केली.

First Published on: August 16, 2019 8:57 PM
Exit mobile version