लॉकडाऊन वाढविण्याबाबत विचार

लॉकडाऊन वाढविण्याबाबत विचार

वणी । जानोरी येथील काही युवक पंढरपुरला सायकलवर जावुन आल्यानंतर काही युवक करोनाबाधीत आल्याने जानोरीच्या रूग्णसंख्येत वाढ झाल्याने जानोरी दोन दिवस बंद ठेवण्यात आले असून गरज पडल्यास आणखी दिवस वाढण्याबाबत विचार सुरू असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी जानोरी येथील सायकलिस्ट पंढरपूर येथे २४ सायकलस्वार गेले असता ते घरी परतल्यानंतर त्यातील काही तरूणांना कोरोना संदर्भीय लक्षणे दिसू लागल्याने त्यांनी तात्काळ तपासणी करून घेतली त्यात ते पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या सहकार्‍यांचे देखील अहवाल खाजगी प्रयोगशाळेत तपासणीसाठी दिले असता १३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर पुन्हा त्यांच्या संपर्कातील व्यक्तिंची तपासणी केली असता त्यांचे व गावातील इतर रूग्ण असे एकूण ४१ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. त्यात ४१ पैकी १० रुग्ण  खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती उपचारांनंतर ठणठणीत आहे.

उर्वरित करोनाबाधीतांना घरीच क्वारंटाईन करून उपचार सुरू असुन त्यांचीही प्रकृतीत सुधारणा झाली आहे. एकूण 14 कंटेनमेंट झोन करण्यात आले असून चार टीम सर्वेक्षण करत आहे. 408 नागरिकांचे सर्वेक्षण सुरू आहे. संपर्कातील व्यक्तींची संख्या वाढत असल्याने गावात लॉकडाउन वाढविण्याबाबत ग्रामपंचायतीकडून विचार सुरू आहे. यासंदर्भात सरपंच संगीता सरनाईक, उपसरपंच गणेश तिडके व ग्रामविकास अधिकारी के.के. पवार यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली.

बाधितांची संख्या ४१ वर पोहोचली आहे .त्यातील आठ-दहा युवक खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून उर्वरित युवकांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. आत्तापर्यंत गावात 127 रुग्ण झाले आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या सूचनांचे नियमित पालन करावे असे आवाहन करतो.
– डॉ. सुजित कोशिरे, तालुका वैद्यकीय अधिकारी

जानोरी गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने गेल्या दोन दिवसापासून गाव लॉकडाऊन करण्यात आले आहे. जोखमीच्या लोकांची तपासणी करण्यात येत असून रुग्ण संख्या वाढू नये म्हणून गावात विशेष खबरदारी घेण्यात येत आहे
– गणेश तिडके उपसरपंच

First Published on: December 26, 2020 6:52 PM
Exit mobile version