‘या’ जिल्ह्यात मेट्रोने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तिकिट दरात मिळणार 30 टक्के सवलत

‘या’ जिल्ह्यात मेट्रोने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तिकिट दरात मिळणार 30 टक्के सवलत

नागपूर महामेट्रोने शालेय विद्यार्थ्यांपासून ते बारावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत मेट्रोच्या तिकीट दरात 30 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी मंगळवार 7 फेब्रुवारीपासून करण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना आपले शालेय ओळखपत्र दाखवून ही सवलत मिळविता येणार आहे. परंतु महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यामध्ये कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. ज्यामुळे त्यांना खासगी वाहन, बस अन्यथा ऑटोचाच पर्याय निवडावा लागणार आहे किंवा प्रवास करण्यासाठी मेट्रोचा वापर करायचा असल्यास नेहमीच्या तिकीट दारातून प्रवास करावा लागणार आहे.

नागपूर मेट्रोने प्रवास करण्यासाठी विद्यार्थ्यांना सिटीबस, ऑटोपेक्षा अधिक तिकीट दार द्यावे लागायचे. जे शालेय विद्यार्थ्यांना न परवडण्याजोगे होते. त्यामुळे विद्यार्थी सिटीबस आणि ऑटोने आपला प्रवास करायचे. पण विद्यार्थ्यांच्या वेळेमध्ये आणि त्यांच्या खर्चामध्ये बचत करण्यासाठी महामेट्रोने हा महत्वपूर्ण निर्णय घेत शालेय विद्यार्थ्यांना आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मात्र यामध्ये कोणतीही सवलत देण्यात आलेली नसल्याने या विद्यार्थ्यांना प्रवास खर्चामध्ये बचत करण्यासाठी इतर पर्याय शोधावे लागणार आहे. मेट्रोचा प्रवास हा सुरक्षित आणि सहज होत असल्याने नागपूरमधील नागरिक मेट्रोचे तिकीट दर अधिक असले तरी याच प्रवासाला पसंती देताना दिसून येतात.

महामेट्रोकडून घोषित करण्यात आलेल्या या सवलतीसाठी शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मेट्रो स्टेशनवरील तिकीट खिडकीवर शाळेचे किंवा कनिष्ठ महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. तर स्टेट बँक ऑफ इंडियाकडून देण्यात येणाऱ्या महाकार्डचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्टेट बँकेच्या सॉफ्टवेअरमध्ये नव्या सवलतीनुसार बदल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या जे विद्यार्थी मेट्रोने प्रवास करण्यासाठी स्मार्ट कार्डचा वापर करत आहेत, त्यांना स्टेट बॅंकेकडून 10 टक्के सवलत दिली जात आहे.

हेही वाचा – कसब्यात हेमंत रासनेंच्या रॅलीत टिळक गैरहजर; भाजपाने तिकीट न दिल्याच्या नाराजीची चर्चा

नागपूरमध्ये ज्येष्ठ नागरिक हे मेट्रोचा प्रवासासाठी सर्वाधिक वापर करतात. पण नागपूर मेट्रोने अचानक भाडेवाढ केल्याने जेष्ठ नागरिकांच्या खिशाला अधिकची कात्री लागली होती. पण कमीत कमी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी काँग्रेसच्या शिष्ठमंडळाकडून नागपूर महामेट्रोला विद्यार्थ्यांसाठी पास आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलत देण्यात यावी, असे निवेदन केले होते.

First Published on: February 6, 2023 1:17 PM
Exit mobile version