“हे सरकार कोसळणारच…”, संजय राऊत यांचा दावा

“हे सरकार कोसळणारच…”, संजय राऊत यांचा दावा

राज्यातील सत्तासंघर्षांच्या निकालावर आज महत्त्वाचा निकाल सुप्रीम कोर्टाकडून देण्यात येणार आहे. त्यामुळे राज्याचेच नाही तर संपूर्ण देशाचे या निकालाकडे लक्ष लागलेले आहे. दोन्ही गटातील राजकीय नेते हे निकाल आमच्याच बाजूने लागणार असा विश्वास व्यक्त करत आहेत. पण हा निकाल लागल्यानंतर राज्यातील सरकार हे कोसळणारच असा दावा ठाकरे गटाचे प्रमुख प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. या गद्दारांचे सरकार कोसळणार, असे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हंटले आहे. त्यामुळे हा निकाल नेमका कोणाच्या बाजूने लागणार, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे.

हेही वाचा – निर्णयाचा अधिकार अपात्र अध्यक्षांकडे देऊ नये – अनिल परब

प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी कायदा, घटना आणि तेव्हाची परिस्थिती पाहून त्यांनी निर्णय दिला होता. ते प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. सध्याचे विधानसभा अध्यक्ष जे काही सांगत आहेत. तो निर्णय माझ्याकडेच येईल, म्हणजे कोणाकडे येईल. तुम्ही घटनाबाह्य सरकार बनवलं आहे. विधानसभा अध्यक्षांची नियुक्ती हा घटनाबाह्य आहे. त्यामुळे निर्णय तुमच्याकडे येणारच नाही. कायद्याने आणि घटनेने तो निर्णय तेव्हाचे अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडेच येणार आहे, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे.

मला न्यायाची अपेक्षा…
आजच्या निकालाबाबत बोलताना राऊत म्हणाले की, मला इतर कोणतीही अपेक्षा नाही. मला फक्त न्यायाची अपेक्षा आहे. आम्हाला सगळ्यांना न्यायाची अपेक्षा आहे. आम्ही न्याय विकत घेणारी माणसे नाही आहोत. जे न्याय विकत घेऊ शकतात. ते सत्तेवर आहेत. त्यांना जी खात्री आहे की न्याय त्यांच्या बाजूने लागेल तर हा त्यांचा मस्तवालपणा आहे. पण आम्ही असे काहीही म्हणणार नाहा कारण आमचा न्यायावर विश्वास आहे.

हे सरकार कोसळणार, हे माझे मत
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हे सरकार स्थिर राहणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर उत्तर देत संजय राऊत म्हणाले की, अजित पवार यांचे ते मत असू शकते. ते विरोधी पक्षनेते आहेत. मी महाविकास आघाडीचा नेता आहे. मी शिवसेनेचा खासदार आहे. आम्ही विरोधापक्षात आहोत आणि मला पूर्ण खात्री आहे. जर 16 आमदार अपात्र ठेवले. तर मुख्यमंत्री अपात्र ठरणार. हे 16 आमदार अपात्र ठरले तर उर्वरित आपोआप अपात्र ठरतील. त्याच्यामुळे हे सरकार क्षणभरही थांबणार नाही. हे सरकार जाईल, अशी ग्वाही आम्ही महाराष्ट्राला देतो. आम्ही महाविकास आघाडीबाबत आशावादी आहोत, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

First Published on: May 11, 2023 10:54 AM
Exit mobile version